मानवता प्राथमिक व हायस्कूलमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
बाबासाहेबांना आयुष्यभर विषमतेचे चटके आणि अवहेलना सहन करावी लागली. परंतु, शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे त्यांना माहिती होते. शिक्षणामुळे दृढ झालेल्या आत्मविश्वासामुळेच जगात सर्वात आदर्श असलेल्या भारतीय संविधानाची रचना त्यांनी केली.
त्यांचा देशासह जागतिक पातळीवर राजकीय, सामाजिक, आर्थिक, कायेदविषयक, महिलांविषयक, शैक्षणिक आणि अत्याधुनिक दूरदृष्टीतील अभ्यास हा फक्त एक आदर्श विद्यार्थीच करू शकतो. विद्यार्थ्यांनो महामानवासारखा विद्यार्थीपणाचा व्यासंग जपा असे प्रतिपादन मानवता प्राथमिक व हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. चारूशिला डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले. कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मानवता प्राथमिक व हायस्कुल येथे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी नव-युवक एज्युकेशन सोसायटीचे संचालक संकेत डोंगरे तर विशेष अतिथीमध्ये पर्यवेक्षक व्ही. व्ही. गजबे, किशोर गहुकर यांची मंचावर उपस्थिती होती. तत्पूर्वी संचालक संकेत डोंगरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
मुख्याध्यापिका चारूशिला डोंगरे पुढे बोलताना म्हणाल्या की, ज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळेच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठ स्थापनेच्या तीनशे वर्षातील ‘सर्वात हुशार विद्यार्थी’ व ‘ज्ञानाचे प्रतीक’ म्हणून बाबासाहेब यांचा गौरव करून विद्यापीठासमोर त्यांचा पुतळा उभारला आहे. आजच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना आदर्श ठेवला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. यानंतर उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पी. एम. शेलकी यांनी तर आभार नवव्या वर्गाची विद्यार्थिनी कु. आर्या शंभरकर हिने मानले.