चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजप पक्षाच्या गटनेत्या म्हणून जयश्री महेंद्र जुमडे यांनी बुधवारी (ता. २९) पदभार स्वीकारला. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी शुभेच्छा दिल्या.
मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सभागृह नेते संदीप आवारी, झोन १च्या सभापती छबू वैरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी जयश्री महेंद्र जुमडे यांनी पदभार स्वीकारला.
त्या बंगाली कॅम्प प्रभाग क्र. ४च्या नगरसेविका आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. यापूर्वी महिला व बालकल्याण उपसभापती आणि सभापती ही पदेदेखील भूषविली आहेत. त्यांचे पती महेंद्र जुमडे हेदेखील नगरसेवक होते. राजकीय आणि सामाजिक कार्याचा दीर्घ अनुभव असून, सर्व नगरसेवक आणि सहकाऱ्यांच्या साथीने चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि चंद्रपूर नगरीच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा संकल्प जयश्री जुमडे यांनी व्यक्त केला. पदग्रहण सोहळ्याला नगरसेवक, नगरसेविका आदींची उपस्थिती होती.