– ओळख पटली, नातेवाईकांच्या सुपूर्द
नागपूर: लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिला केवळ नातेवाईकच मिळाले नाही तर तिच्या अंगावरील लाख रुपये qकमतीचे दागिने अन् रोख सुरक्षित आहे. निष्काळजीपणा झाला असता तर तिच्यासह दागिनेही लंपास झाले असते. हा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर घडला.
रिना (काल्पनिक नाव) असे तिचे नाव आहे. ती गोंदियाची रहिवासी आहे. ती शनिवार १२ जून रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर आली. तिच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. ती भेदरलेल्या अवस्थेत होती. लोहमार्ग पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाèयांचे लक्ष तिच्याकडे गेले. उज्ज्वला तोडापे, विणा भलावी, नाजनी पठाण, श्रध्दा मिश्रा आणि दिपाली डोमके यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. भेदरलेल्या स्थितीत पाहून पोलिसांनी तिला आपलेपणाची जाणीव करून दिली.
तिला धीर दिला. मेयो रूग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयाच्या आदेशाने प्रादेशिक मनोरूग्णालयात दाखल केले. रूग्णालयातील एका परिचारीकेने तिला ओळखले. तिची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. मंगळवारी तिची बहिण पतीसह आली. महिलेला नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिच्यासह दागिनेही सुरक्षित आहेत.