झारखंड: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिला टप्पा 13 नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या घोषणेसह झारखंडमध्ये आचारसंहीताही आजपासून लागू झाली आहे.
झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी मतदान होणार आहे. या जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी अर्थातच विजय संपादन करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी केली आहे.
झारखंड नक्षली भाग असल्यामुळे निवडणूक घेण्यास अडचणी येतात. यावेळी आम्ही फक्त दोन टप्प्यात निवडणुका घेत आहोत, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
झारखंड विधानसभा निवडणुका 2019 मध्ये 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या पाच टप्प्यांत झाल्या होत्या आणि 23 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. त्या निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सध्या तेथील मुख्यमंत्री आहेत.