Published On : Tue, Jun 14th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट करणार – डॉ. नितीन राऊत

शाळांमध्ये सोलर ऊर्जेचा वापर करा
मुद्देनिहाय व योजनानिहाय प्रस्ताव सादर करा

नागपूर : जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या विद्युतीकरणासह डिजीटलायझेशन करुन स्मार्ट पोलीस स्टेशन करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. त्यासोबतच सर्व शाळा सौर ऊर्जेवर करा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

Gold Rate
Wednesday 26Feb. 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्हा नियोजन कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, आमदार अभिजीत वंजारी, राजु पारवे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधिक्षक विजय मगर, कार्यकारी समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

डिजीटलायझेशनमुळे पोलीस स्टेशनमध्ये वाय-फाय सर्व ठिकाणी राहील. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारणासाठी होईल. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण पोलीस विभागाने द्यावे. सौर ऊर्जेचे उपकरण सर्व शाळांवर कार्यान्वित करा. यामुळे विद्युत बचत होईल. पोलीस व शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागावर जास्त भर द्या, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासकीय सेवापुर्व स्पर्धा परीक्षा केंद्राचे डिजीटलायझेशन करुन त्याचा लाभ तेथील विद्यार्थ्यांना द्या. जास्तीत जास्त विद्यार्थी युपीएसी व एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात 7 पैकी नागपूर येथील केंद्र प्रथम क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर पालकमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाच्या तुलनेत राज्याचा वाटा किती आहे, राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा वाटा किती आहे याचा आढावा घ्या. त्यानुसार प्रस्ताव सादर करा. या सेंटरमधील वसतिगृह सर्व सोयीयुक्त करा, अभ्यासासाठी वातावरण निर्मितीसह चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थी युपीएससी व एमपीएससी मध्ये अग्रणी राहतील यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात विधानसभा निहाय सेंटर चालु करा व ते मुख्य सेंटरला जोडा व वैचारिक पध्दतीत बदल घडवून आणा, असेही पालकमंत्री म्हणाले.

कौशल्य विकासाचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, महास्वयंम पोर्टलवर सर्व उद्योग व व्यवसायांची शंभरटक्के नोंदणी करा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षणावर भर द्या. प्लेसमेंटनुसार निधी वाटप करण्यात येइल, असेही त्यांनी सांगितले.

कौशल्य विकासातून रोजगार निमिर्ती झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न थांबेल. स्थानिकांनी व्यवसायात प्राधान्याने सामावून घ्या, असे खासदार कृपाल तुमाने म्हणाले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी व राजु पारवे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

पाणी पुरवठा विभागांतर्गत जलजीवनच्या सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर करा. पुण्याच्या धर्तीवर सर्व नागरिकांना स्वच्छ फिल्टरचे पाणी द्या जिल्ह्यात उच्च रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी लागणारे साहित्य वाटप करा. महापालिकेने विधानसभानिहाय सीबीएससी शाळा सुरु करण्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र सुरु करावेत, असेही ते म्हणाले.

विकास निधीच्या कामांच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधी आमंत्रित करा. योजनांतर्गत शिलाई मशीनचे वाटप करा. शहरी व ग्रामीण भागात स्मार्ट स्कुलसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेळी पालन व दुधाळ जनावर वाटप योजना सुरु करा. त्यास निधी देण्यात येईल. दिल्लीच्या धर्ती जिल्ह्यात स्मार्ट स्कुल योजना राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गडचिरोलीप्रमाणे नाविण्यपूर्ण योजनेतून मॉडुलर स्कुलसाठी प्रस्ताव सादर करा. लवकरच नगरपालिका व महानगरपालिकांची निवडणूक येत असल्याने मुद्देनिहाय व योजनानिहाय सर्व प्रस्ताव तत्काळ सादर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी अपारंपारिक ऊर्जा, पोलीस विभाग, महापालिका, जि. प. शाळा दुरुस्ती, वाचनालय, शिक्षण विभागासह विविध विषयाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस संबंधित सर्व विभागाचे प्रमुख,पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement