नागपूर: नागपूर महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी जितेंद्र (बंटी) कुकडे यांची अविरोध फेरनिवड झाली.
परिवहन समिती सभापतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे शुक्रवारी (ता. २५) या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सकाळी ११ वाजतापर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या वेळेपर्यंत केवळ नगरसेवक जितेंद्र कुकडे यांनी दोन नामांकन पत्र दाखल केले होते. एका नामांकन पत्राच्या सूचक नगरसेविका अर्चना पाठक तर अनुमोदक विद्या मडावी होत्या. दुसऱ्या नामांकन पत्राच्या सूचक अभिरुची राजगिरे आणि अनुमोदक उज्ज्वला शर्मा होत्या. छानणीअंती दोन्ही नामांकन पत्र वैध ठरले. एकाचे उमेदवाराचे नामांकन अर्ज असल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जितेंद्र कुकडे यांना अविरोध विजयी घोषित केले.
निवडीनंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सभापतीपदी निवड झालेले जितेंद्र कुकडे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, निगम सचिव हरिश दुबे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप आणि परिवहन समितीचे सदस्य उपस्थित होते.