Published On : Thu, Nov 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

विकसित भारताच्या यात्रेत सहभागी व्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ

Advertisement

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या यात्रेची संकल्पना मांडली आहे. ही यात्रा आता तुमच्या गावात येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.

केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, या योजनांचा लाभ त्यांना मिळावा, यादृष्टीने केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. हिंगणा तालुक्यातील वडधामना येथे आयोजित कार्यक्रमात नागपूर जिल्ह्याच्या यात्रेचा शुभारंभ झाला.

यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. देशभरात विविध राज्यांमधील अनेक शहरांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. वडधामना येथे आयोजित कार्यक्रमात ना. श्री. नितीन गडकरी यांच्यासह आमदार समीर मेघे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजप नेते अरविंद गजभिये, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement

ते म्हणाले, ‘देशातील १५ हजार स्वयंसहायता बचत गटातील महिलांना शेतात द्रोणचा वापर करण्याचे व द्रोणच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार आहे. वयोश्री योजनेचे जिल्ह्यात ४० हजार लाभार्थी आहेत. आयुष्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरातील औषधे उपलब्ध झाली आहेत. तर किसान सन्मान योजनेमुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचत आहेत. देशातील नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, या उद्देशाने सरकार अनेक योजना राबवित आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी योजनांची माहिती विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सर्वांना मिळणार आहे.’