नागपूर: भारताचे चंद्रयान-३ अखेर चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला. नागपुरात चंद्रयान-३ च्या यशस्वी कामगिरीनंतर सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. ढोल ताशांच्या गजरात लहानापासून तर ज्येष्ठांपर्यंत आनंदोत्सव साजरा करीत आहेत. ‘भारत माता की जय’ म्हणत तरूणवर्ग अभिमानाने भारताचा तिरंगा झेंडा हातात घेऊन मिरवणूक काढत आहे.
कारण अंतराळात भारताने मोठी कामगिरी करून दाखवली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताचे चांद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरले आहे. हे यश मिळवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. दरम्यान, १४० कोटी लोकांची प्रार्थना आणि इस्रोच्या १६ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या चार वर्षांच्या मेहनतीला आज यश आले.
चंद्रयान-३ मिशन १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी लॉन्च झाले होते. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले होते.