नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अद्यापही निकाल लागला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हा निकाल ३१ जानेवारीपर्यंत जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र आता आता सर्वोच्च न्यायालयाने विधासनभा अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे. जयंत पाटलांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
३० ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
परंतु, मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागितला.अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका जयंत पाटलांनी केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना तुषार मेहता यांनी मुदतवाढीची मागणी केली.