नागपूर. महाराष्ट्रातील खेळाडूंनी देशात राज्याचे नावलौकीक केले आहे. अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी ही उत्कृष्ट आहे. राज्यात खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे व त्यादृष्टीने कार्य सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या सहकार्याने मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे शुक्रवारी २८ फेब्रुवारी स्व. रतन टाटा परिरसर लक्ष्यवेध मैदान नरेंद्र नगर येथे रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते श्री. स्वप्नील जोशी यांची उपस्थिती होती. मंचावर स्पर्धा आयोजनाचे मार्गदर्शक आमदार श्री. प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी होते. मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्री. विनोद जाधव, मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या स्वागत समितीचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी, स्पर्धा स्वागत समितीचे उपाध्यक्ष श्री. अविनाश ठाकरे, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी खासदार श्री. अशोक नेते, माजी आमदार श्री. गिरीश व्यास, भारतीय कबड्डी संघाचे सचिव श्री. जितेंद्र सिंग, माजी स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, माजी नगरसेवक श्री. संदीप गवई, माजी नगरसेविका श्रीमती विशाखा मोहोड, श्रीमती जयश्री वाडीभस्मे, स्पर्धेचे संयोजक श्री. रितेश गावंडे, श्री. संजय पवनीकर, श्री. भूषण केसकर, श्री. श्रीकांत दुचक्के, श्री. रमेश भंडारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मनपाच्या चिंचभुवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हुला हुप्स डान्सचे योगा रामायण सादर करणा-या अमित योगा ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नागपूर महानगरपालिका आणि लक्ष्यवेध फाउंडेशनने पुढाकार घेउन अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे देखणे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यात खेळाच्या विकासासाठी पुणे येथे क्रीडा विद्यापीठ तयार केले जात आहे. याशिवाय नागपुरातील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाचा त्यादृष्टीने विकास होत आहे. मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा सार्थक ठरेल. उत्तम वातावरणात खिलाडूवृत्तीने ही स्पर्धा संपन्न होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कबड्डी हा पूर्णत: भारतीय खेळ आहे. आधी मातीवर खेळला जाणारा हा खेळ आता मॅटवर खेळला जातो. या खेळात आपल्या देशातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले आहे. भारतीय कबड्डी संघामध्ये जास्तीत जास्त खेळाडू हे महाराष्ट्र आणि हरियाणाचे असतात. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राज्याचे नावलौकीक केले आहे. प्रो-कबड्डी स्पर्धेचे कबड्डीला एक दर्जा प्रदान केला व ग्लॅमर दिले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर महानगरपालिका वेगवेगळ्या खेळांना विकसीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच शहरात खेळाचे चांगले मैदान तयार होत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मनपा आर्थिक सहकार्य देखील करीत असल्याबाबत देखील त्यांनी आनंद व्यक्त केला. खेळामध्ये आपल्या व्यथा विसरून मैदानात उतरून आपली खिलाडूवृत्ती दर्शवितात. खेळामुळे संघभावना निर्माण होते. खेळात जय पराजयापेक्षा सहभागीता महत्वाची असते. स्पर्धेत सहभाग नोंदविणा-या सर्व खेळाडूंचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
प्रारंभी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन स्पर्धेचे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू स्नेहल जोशी व संजना जोशी हे मशाल घेउन मंचावर आले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनपा बाबुरावजी बोबडे इंग्रजी माध्यम शाळा चिंचभुवन येथील विद्यार्थ्यांनी हुला हुप्सचे सादरीकरण केले. अमित योगा ग्रुपद्वारे योगासन प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मनपाच्या उडान खेल प्रोत्साहन योजनेअंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणा-या खेळाडूंना अर्थसहाय्याचे धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन खेळाडू संजना जोशी, बास्केटबॉलपटू सिया देवधर, पॅरा चेस, एशियन पॅरा गेम्समध्ये सहभागी मृणाली पांडे, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता राजेश भट, राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक विजेता रोहन गुरबानी या खेळाडूंना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश प्रदान केले.
प्रास्ताविक स्पर्धा स्वागत समितीचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा २८ फेब्रुवारी, १ आणि २ मार्च या कालावधीमध्ये आयोजित होत आहे. अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुषांचे २० संघ तर महिलांचे १६ संघ सहभागी झाले आहेत. स्व. रतन टाटा परिरसर लक्ष्यवेध मैदान येथे स्पर्धेसाठी ६ मैदान तयार करण्यात आलेली आहेत. तीन दिवस कबड्डीचा थरार नागपूरकरांना अनुभवयाला मिळणार आहे. आज देशी खेळांना नवे रुप मिळाल्याने खेळाचा विकास होतो आहे. गेल्या ३५ वर्षापासून नरेंद्र नगर क्रीडा मंडळ सुरु होते. या मंडळाचे पुढे लक्ष्यवेध फाउंडेशन असे नामकरण झाले. लक्ष्यवेधद्वारे विविध स्पर्धांसाठी पुढाकार घेण्यात येत असतो, असेही ते म्हणाले. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचेही श्री. संदीप जोशी यांनी आभार मानले. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पुरस्कार विजेत्या संघाला २ लक्ष ५१ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर द्वितीय क्रमांकासाठी १ लक्ष ५१ हजार आणि तृतीय क्रमांकाला १ लक्ष १ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. महिला गटात प्रथम क्रमांकाला १ लक्ष ५१ हजार, द्वितीय क्रमांकाला १ लक्ष १ हजार आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला ७१ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, असेही श्री. संदीप जोशी यांनी सांगितले.
खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी मैदानात या : मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी
मनपा आयुक्त तथा डॉ. अभिजीत चौधरी यांनी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन आणि मनपाचे क्रीडा स्पर्धांसाठी उपक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात क्रीडा स्पर्धांसाठी विशेष पुढाकार घेण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या पुढाकाराने यंदा पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी विशेष क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षणोत्सवामध्ये देखील विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा विकासासाठी नागपूर महानगरपालिकेने महत्वपूर्ण पुढाकार घेत मनपा शाळांमध्ये १२ क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपातर्फे शाळांमध्ये क्रीडांगण विकसित करण्यात येत आहेत. प्रतापनगर येथे साडेचार कोटी रुपयांच्या निधीमधून टेबल टेनिस एक्सेलन्स सेंटर तयार करण्यात येत आहे. दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा साहित्य खरेदी करण्यात येत आहेत. नागपुरात लॉन टेनिसच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मनपा लवकरच महाराष्ट्र लॉन टेनिस अससोसिशन सोबत सामंजस्य करार करणार आहे. बाजीप्रभू नगर रामनगर येथे मैदानावर आंतराष्ट्रीय दर्जाचे कोर्ट तयार केले जाणार आहे. शहरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्याकरीता मनपाद्वारे ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाणार आहे. मनपाद्वारे १० आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंना प्रत्येकी २ लक्ष रुपये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असलेल्या २ खेळाडूंना प्रत्येकी १ लक्ष रुपये, राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त १५ खेळाडूंना प्रत्येकी १ लक्ष रुपये, राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असलेल्या ९ खेळाडूंना प्रत्येकी २१ हजार रुपये आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील ३८ खेळाडूंना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. अखिल भारतीय भारतीय कबड्डी स्पर्धा नागपूरसाठी मोलाची ठरेल आणि शहरातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन शिकवण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी स्पर्धेला भेट द्यावे, असे आवाहनही मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
पाल्याला एकतरी मैदानी खेळ खेळायला लावा : स्वप्नील जोशी
क्रिकेटच्या पलिकडे इतर खेळांना विशेषत: देशी खेळांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे पाहून आनंद वाटतो, अशी भावना सुप्रसिद्ध अभिनेते श्री. स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. त्यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी परीश्रम घेणा-या सर्वांचे अभिनंदन केले. अमित योगा ग्रुपद्वारे रामयणाच्या थिमवर योगासनचे सादरीकरण करण्यात आले. याचे कौतुक करीत श्री. स्वप्नील जोशी यांनी रामायण मालिकेमध्ये लव-कुश बांधवांमध्ये कुशची भूमिका बजावताना आलेले अनुभव कथन केले. उद्याची पिढी घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने आवर्जून आपल्या पाल्यांना एकतरी मैदानी खेळ खेळायला लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी घेतला स्पर्धेचा आनंद
मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्याचे नाणेफेक केले. यानंतर त्यांनी या सामन्याचा आनंद घेतला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे संचालन आरजे आमोद यांनी केले व आभार मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी मानले.
उडान खेल प्रोत्साहन योजनेद्वारे ७४ खेळाडूंना अर्थसहाय्य
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्याकरीता तथा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राष्ट्रीय गेम, राष्ट्रीय स्पर्धा, कनिष्ठ व परिष्ठ यांच्या स्तरानुसार पदक प्राप्त खेळाडूंना प्रोत्साहनास्तव ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ७४ पात्र लाभार्थ्यांना अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेमध्ये मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकूण ५७ लक्ष ८९ हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले. मनपाद्वारे १० आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंना प्रत्येकी २ लक्ष रुपये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असलेल्या २ खेळाडूंना प्रत्येकी १ लक्ष रुपये, राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त १५ खेळाडूंना प्रत्येकी १ लक्ष रुपये, राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असलेल्या ९ खेळाडूंना प्रत्येकी २१ हजार रुपये आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील ३८ खेळाडूंना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.
स्पर्धेमध्ये सहभागी संघ
पुरुष संघ : सेंट्रल रेल्वे मुंबई, टीएमसी ठाणे, रुपाली ज्वेलर्स मुंबई, हिंदुजा हॉस्पिटल मुंबई, बीएमटीसी बंगळुरू, युवा पलटण पुणे, साई गुजरात, स्टार अॅकेडमी जबलपूर, वेस्ट बंगाल स्टेट, हरियाणा स्टेट, आंध्रप्रदेश स्टेट, युवा एकता लखीटी यूपी, कर्नाटक स्टेट, झारखंड स्टेट, छत्तीसगड स्टेट, बारामती स्पोर्ट्स, एनडी स्पोर्ट्स दिल्ली, जय हिंद वरोरा, राजपूत स्पोर्ट्स जानेफळ.
महिला संघ : सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साई गुजरात, दिल्ली अकादमी, छत्तीसगड स्टेट, वेस्ट बंगाल स्टेट, तामिलनाडू स्टेट, टीएमसी ठाणे, बारामती स्पोर्ट्स, पेंढरा रोड छत्तीसगड, युवा कल्याण छिंदवाडा, सांगली स्पोर्ट्स, जैन क्लब वरोरा, रेंज पोलिस नागपूर, नागपूर जिल्हा, स्टार अॅकेडमी जबलपूर.