नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज दि ५ अॉगस्ट २०२२ रोजी सुधीर आपटे लिखित कै. कृ. जागेश्वर भीष्म यांच्या चरित्ररूपी पुस्तकांचे प्रकाशन मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते भीष्म प्रतिष्ठानच्या मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले.
संतकवी प्रसिध्द श्री. कै. वेदशास्त्रसंपन्न कृष्णशास्त्री जागेश्वर भीष्म जन्म १४ ऑगस्ट १८५४ बुटीबोरी नागपूर, मृत्यू ८ ऑगस्ट १९३५ मोहपा, नागपूर येथे झाला. प्रत्यक्ष साईबाबांच्या सहवासात राहून साईबाबांच्या आरत्या लिहिणारे तसेच, शिर्डी येथे प्रथम रामजन्म उत्सव सुरु करणारे’ कृष्णानंद भीष्म हे एकमेव होते.
संतकवी भीष्मांनी ज्या आरत्या लिहिल्या त्यासुध्दा साईबाबांच्या प्रेरणेने, कृपेने. ‘एक दिवस साईबाबा म्हणाले तू लाडू एकटाच खातो आम्हाला काहीच देत नाही. आता तरी तू मला पाच लाडू दे’, त्यानंतर भीष्मांना काव्य स्फुरले. आपल्या रचना ते साईबाबांना ऐकवायचे आणि त्यांच्या आज्ञेने इतरांना ऐकवायचे असा क्रम सुरू झाला. ‘साईनाथ सगुणोपासना’ ह्या नावाची पुस्तीका तयार करून त्यांनी साईचरणी अर्पण केली. आजही शिर्डीत आणि जगात ज्या ज्या ठिकाणी साईमंदिरे आहेत तिथे या आरत्या मोठ्या भक्तिभावाने म्हटल्या जातात.
कृष्णानंद भीष्मांनी साईबाबांच्या समोर रामायण, भागवत, महाभारत, ज्ञानेश्वरीचे वाचन केले. साईबाबांची पुजा अर्चना केली. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण अष्टमी, रामनवमी उत्सव भीष्मांनी बाबांच्या परवानगीने सुरू केले. शिर्डीत रामनवमीचे पहिले कीर्तन इ.स. १९११ मध्ये भीष्मांनी साईबाबापुढे केले. तेव्हा साईबाबांनी उठून त्यांच्या गळ्यात हार घातला. कवी हृदयाच्या वितरागी कृष्णांनी वेद उपनिषदे पुराणे यांचा अभ्यास करून मानवी जीवनाची सार्थकता कशात आहे? याचा ध्यास घेतला, वाल्मिकी रामायणाचा सखोल अभ्यास करून रामायणकालीन भारतीय शासन पध्दती व इतर बाबींचे संशोधन केले आहे.
मा. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आयोजित प्रकाशन समारंभास डॉ. रवी किशोर गलांडे, बबन नाखले, कल्याणी बुटी, प्रमोद भीष्म, माणिक भीष्म, मोहन देशपांडे, नितीन भोपे, महादेव बोराडे, डॉ आशिष उजवणे, अभिषेक आचार्य, ज्ञानेश्वर पवार, प्रवीण मुधोळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.