‘विक्रमोर्वशीयम्’वर आधारित सांस्कृतिक अविष्काराचे प्रभावी सादरीकरण, महेश काळे आणि सुकीर्ती उईके यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
नागपूर : प्रसिध्द नर्तिका अरुपा लाहिरी यांच्या भरतनाटयमसोबत गायक महेश काळे आणि सुकीर्ती उईके यांच्या शास्त्रीय गायनाने आज येथे आयोजित तीन दिवसीय कालिदास समारोहाच्या पहिल्याच दिवशी रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन दिवशीय या समारोहास आज येथे उत्साहात सुरुवात झाली. या समारोहाचे उद्घाटन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव नागपूरला राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक ओळख करुन देण्यात यशस्वी ठरल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कालीदास समारोह आयोजन समिती, पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कालिदास समारोहाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी महापौर संदीप जोशी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, उपायुक्त सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
कालिदास समारोहाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. नितीन राऊत म्हणाले, कवी कुलगुरु कालिदास यांच्या रचनांवर आधारित कालिदास समारोह ही केवळ नागपुरचीच ओळख नसून संपूर्ण देशात या शहराला एक सांस्कृतिक ओळख देणारा उपक्रम म्हणून त्याचे आयोजन यशस्वी ठरले आहे. विदर्भाची सांस्कृतिक परंपरा व्यापक करण्यासोबतच ती संवर्धित करणारे ते एक महत्वाचे माध्यम ठरले आहे. या समारोहाला नागपूरकर रसिकांनी दिलेली दाद निश्चितच प्रशंसनीय असल्याचे सांगतांना ‘परंपरेचा पुन्हा अविष्कार ‘हे ब्रीदवाक्य घेऊन यंदा देखील कालिदास समारोह रसिकांच्या पसंतीत उतरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागपूर संत्रानगरी सोबत रसिक नगरी देखील आहे. या समारोहाच्या रुपाने दरवर्षी आनंदाचे रसग्रहण करण्याची संधी नागपूरकरांना मिळत असते. नागपूर हे सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येत आहे. कोणत्याही समारोहाला उत्कृष्ट श्रोतावृंद लाभतो. तेव्हा तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. कालिदास समारोह हा खऱ्या अर्थाने यशस्वी महोत्सव असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, कालिदास समारोह रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राची ओळख व्हावी, यासाठी या समारोहाचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात आले आहे. विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाकडे लक्ष वेधण्यासोबतच नागपूरला राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी हा समारोह मोलाचा ठरला आहे. महाकवी कालिदासावर ऐतिहासिक वारसासंपन्न विदर्भ भूमी यांच्यातील नात्याचे बंध उलगडणारा हा महोत्सव आहे. खऱ्या संगीत प्रेमींसाठी विनाशुल्क अशी सांस्कृतिक मेजवानी या समारोहात राहील व रसिकांचा प्रतिसाद पाहता दरवर्षी या समारोहाचे आयोजन करण्यात येईल, अशी आश्वस्त हमी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिली.
कालीदास समारोहाच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली असून कालीदास समारोहातील कार्यक्रमांचे आयोजन हे उच्च अभिरुचींना प्रोत्साहन देणारे असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी नागपूरच्या कालिदास महोत्सवाची गणना महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात होत असल्याने सांगीतले. ते म्हणाले, कवि कुलगुरु कालिदास यांच्या सात अजरामर कलाकृती आहेत. यंदा ‘विक्रमोर्वशीयम्’ या महाकवी कालिदास यांच्या कालजयी ग्रंथाचा आधार घेवून भारतीय शास्त्रीय संगीत परंपरातील गायन, वादन व नृत्य परंपरेचा आविष्कार दर्शविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. संगीतातील समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यासाठी हा उपक्रम आहे.
सुरुवातीला श्रीमती सुकीर्ती उईके या स्थानिक कलावंतानी शास्त्रीय गायन सादर केले. यावेळी त्यांनी गणेशवंदना सादर करुन कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी ‘पायलीया झनकाये’ तसेच ‘याद पिया की आये’ ही ठुमरी सादर केली. त्यांच्यासोबत सहकलाकार श्रीकांत पिसे, रमेश उईके तसेच श्रीमती शर्वरी नाईक यांनी आपली कला सादर केली. त्यानंतर श्रीमती अरुपा लाहिरी यांच्या भरतनाट्यमने या समारोहाला पहिल्याच दिवशी एका विशिष्ट उंचीवर नेवून पोहचविले. श्रीमती लाहिरी यांनी रसिकांच्या आग्रहामुळे यंदा देखील नृत्याविष्कार सादर केला.
कवी कालिदास यांच्या विक्रमोर्वशियम् या नाटकावर आधारित भरतनाट्यम् नृत्य अरूपा यांनी सादर केले. वासुदेवन् अय्यंगार यांचे नृत्यदिग्दर्शन असलेल्या या बोलांची साथसंगत वसुधा बालकृष्ण यांनी केली तर देविका राजारामन् मृदंगमवर शंकर नारायण स्वामी बासरीवर अर्धनारीश्वरने सादरीकरणाचा समारोप केला. नेमक्या मुद्रा, देखणे पदलालित्य आणि अनुरूप भावना असा अनोखा मेळ त्यांच्या सादरीकरणात होता. स्वर्गीय स्वरांनी आपला चाहतावर्ग निर्माण करणारे गायक महेश काळे यांनी आज नागपूरकरांना त्यांच्या कलाकृतीमुळे तृप्त केले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेणुका देशकर व श्रीमती श्वेता शेलगावकर यांनी केले.