नागपूर – कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात २० म्हशी व चार वाहने असा एकूण सुमारे १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिध्दीकी नवाब सय्यद (२९),सोहीत रामदयाल तांडेकर (२१),विकेश भोजराम पुरखे (४२), बादल रामप्रसाद हडमाचे (२२), कुणाल विनोद मानवटकर (२२) आनंद लक्ष्मण चांदपुरे (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई ७ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. गस्त घालणाऱ्या बिट मार्शल यांना माहिती मिळाली की, पावनगाव ग्रामपंचायत रोडवर काही लोक जनावरांची अवैध वाहतूक करत आहेत. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, चार वाहने संशयास्पद स्थितीत आढळली, ज्यामध्ये प्रत्येकी ५ अशा एकूण २० म्हशी निर्दयीपणे, चारा-पाण्याशिवाय बांधून ठेवण्यात आल्या होत्या.
जप्त करण्यात आलेली वाहने पुढीलप्रमाणे –
टाटा योध्दा (MH36 AA 2724)
बोलेरो पिकअप (MH40 BL 5009)
टाटा योध्दा (MH36 AA 3583)
बोलेरो पिकअप (MH49 AT 8905)
सर्व आरोपी हे भंडारा जिल्ह्यातील असून त्यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. प्राथमिक चौकशीत त्यांनी जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी नापोअं नरेंद्र बावीस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोउपनि ज्ञानेश्वर मोरे यांनी प्राणी संरक्षण अधिनियम १९६० अंतर्गत कलम ११(१)(ड), ११(१)(ग) तसेच मोवाका कलम ८६, १७७, ३/१८०, ५/१८१ आणि मवोका कलम ११९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पुढील तपास पोलिसांकडून सुरु असून, अवैध जनावर वाहतुकीमागील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.