नगर परिषद कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यात वळती, वेतनासाठी झिजवितात उंबरठे
कामठी :-कामठी नगर परिषद च्या जलप्रदाय विभागात कार्यरत कर्मचाऱ्याचे वेतन नगर परिषद व बँकेच्या चुकीमुळे दुसऱ्या खातेधारकाच्या बँक खात्यात वळती करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला असून या वेतनाच्या परताव्यासाठी नगर परिषद कर्मचारी संबंधीत बँक तसेच नगर परिषद प्रशासनाचे उंबरठे झिजवीत आहे मात्र याची दखल कुणी घेत नसल्याने नगर परिषद च्या चुकीमुळे रोजंदारी कर्मचाऱ्याची बोळवण होत आहे.
प्राप्त माहितीनुसार कामठी नगर परिषद कार्यालयात मागील कित्येक वर्षांपासून रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या झिबल गजवे,आनंद दुर्बुळे, दर्शन गोंडाने,राजेंद्र शयामकुवर,आसाराम नारदलेवार, संजय चव्हाण या सहा कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी 2022 चे वेतन एकूण 90 हजार 354 रुपये बँक ऑफ इंडिया कामठी च्या बँक खात्यात जमा करून या सहाही कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 15 हजार 59 रुपये प्रमाणे त्यांच्या पगारी बँक खात्यावर जमा करण्याचे लेखी देण्यात आले.
मात्र यातील सहा कर्मचाऱ्यांपैकी संजय रामचंद्र चव्हाण नामक कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांकामध्ये एक क्रमांक चुकीचा उल्लेखित केल्याने बँकेच्या कर्मचाऱ्याने त्या खाते क्रमांकावर वळती केलेले वेतनाची रक्कम ही संजय मिश्रा नामक व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाली व त्या खाते धारकाने आकस्मिक आलेल्या त्या रकमेचा खर्च सुदधा करून घेतला.
तर ही चूक लक्षात येताच या चुकीचे खापर बँक कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी एका मेकाकडे बोट दाखवून आरोप फोडत आहेत तर दरमहा मिळणाऱ्या या वेतनाच्या आधारावर कुटुंबाचा आर्थिक नियोजन बिघडले आहे तर स्वतःच्या हक्काच्या वेतनासाठी या कर्मचाऱ्याची बोळवण होत असून मानसिक त्रास भोगावा लागत आहे .तेव्हा हक्काचे वेतन लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी कर्मचारी संजय चव्हाण च्या कुटुंबीयांनी केले आहे.