मुंबई: कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत भाजपनं आघाडी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. मतदान यंत्राचा विजय असो, असं खोटक ट्विट त्यांनी केलं आहे.
कर्नाटक निवडणूक निकाल हाती येताच विरोधकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर ईव्हीएम मशीन वरून निशाणा साधला. मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून निवडणुका जिंकल्याचा आरोप भाजपवर नेहमीच होत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावरून भाजपवर सातत्याने टीका केली आहे. आता कर्नाटक निवडणूक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. निवडणूक निकालांचे सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने लागल्याचे पाहून राज यांनी खोचक ट्विट केले आहे. ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा विजय असो,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.