Published On : Sat, Jun 2nd, 2018

काँग्रेस व ‘कुणबी स्वाभिमान’ यांनी राष्ट्रवादीला तारले!

BJP MP Nana Patole

नागपूर: भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकांच्या दोन दिवस आधीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची निराशा होती. प्रचारमोहिमेत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाच्या (प्रफुल पटेल) ‘अर्धवट’ सहभागामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाखूष होते, तर ‘साधन-सामुग्रीच्या’ अभावापायी राष्ट्रवादीचे शिलेदार तक्रार करीत होते. परंतु दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या प्रचारमोहीमेने मात्र चांगलाच जोर पकडला होता.

भाजपच्या कंपूमध्ये शिगेला पोहोचलेल्या उत्साहापायी गडचिरोली मतदारसंघात मोडणाऱ्या पण गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या आमगाव येथे पक्षाची बैठक ठेवण्यात आली. भाजपाकडे प्रचारासाठी ७० वाहने होती तर काँग्रेस-राष्ट्रवादी दोघांकडेही मिळून फक्त एक. भाजपने आपल्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारावर जोरदार निशाणा साधताना त्यांना बुजुर्ग, अनाकर्षक, बाहुला, बळीचा बकरा, तात्पुरता उमेदवार अशी नाना दूषणे दिली. त्यातच भर म्हणून अशी अफवा पसरली की, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी भाजपसोबत छुपा ‘समझोता’ केला आहे. मात्र असे काही घडल्याचे नंतर खुद्द पटेलांनी नाकारले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे हे ‘कुणबी समाजाचे’ प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भाजपने पोवार समाजाच्या हेमंत पटले यांना उमेदवारी दिली. प्रचारदरम्यान काँग्रेसच्या एका जेष्ठ कुणबी नेत्याने गोंदिया येथे झालेल्या एका सभेत म्हंटले की, “भाजपवाले मधुभाऊंना कमजोर उमेदवार म्हणताहेत, आपण खरेच कमजोर आहोत का ? आपल्या माणसाला निवडून देण्याची धमक आपल्यात नाही का ? चला, आपली शक्ती त्यांना दाखवूया”, असे भावनिक आवाहन केल्यानंतर भंडारा-गोंदिया क्षेत्रात ४ लाख मतदारसंख्या असलेला कुणबी समाज प्रेरित झाला.

काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना पटोले हे देखील कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी कुकडे यांच्या प्रचारासाठी आपल्याच ओबीसी समाजाचे व नागपूर जिल्ह्याचे काँग्रेस आमदार सुनील केदार आणि काँग्रेस पक्षाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रफुल गुडधे यांना पाचारण केले. पटोले स्वतः लाखांदूर-साकोली भागात लक्ष देत होते, तर केदार आणि गुडधे यांनी अनुक्रमे गोंदिया आणि भंडारा येथे प्रचाराची धुरा सांभाळली.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्या-दरम्यान राष्ट्रवादीचे heavy-weight नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी प्रचारमोहीत सहभाग नोंदवून राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी तथाकथित ‘साधन-सामुग्रीची’ पूर्ण व्यवस्था केली. दरम्यान मतदानाच्या दिवशी १ वाजता मतदान केंद्रांवर अनेक ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळेच भाजपासाठी नकारात्मक वातावरण तयार झाले.

तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार असलेले मधुकर कुकडे (६७) हे सन २०१४ पर्यंत भाजपसोबत होते. मदतीला बोलावल्यानंतर अवघ्या काही वेळेत पोहोचणारा, सहज संपर्क साधता येणारा नेता असा लौकिक असल्याने कुकडे यांना त्यांच्या मतदारसंघात “१०८- ऍम्ब्युलन्स” या टोपणनावाने ओळखले जाते. निवडणुकीच्या अंतिम निकालामध्ये कुकडे यांनी ग्रामीण भागांत स्पष्ट आघाडी घेतली. तर दोन शहरी क्षेत्रात मात्र त्यांची थोडी पीछेहाट झाली. कुकडे यांच्या विजयाने अचंबित दिसणारे प्रफुल गुडधे म्हणाले की, “भाजपचा झालेला हा पराभव हा जनादेश आहे.” त्यांनी सांगितले की, “आम्ही राष्ट्रवादीसाठी जोरदार प्रचार केला असला तरीही, भाजपला या निवणुकीत लोकांनी धूळ चारली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातील सामान्य जनतेने उद्धट आणि उर्मट भाजपशी लढा देऊन आपल्या न्यायालयात औधत्याला जागा नसल्याची शिकवण त्यांना दिली आहे.”

दुसरीकडे भाजप जातीय समीकरणांवर भरवसा ठेवून होती. पोवार समाजाची २.५ लाख मते भाजपलाच मिळतील असा निश्चित अंदाज पक्ष-नेतृत्वाला होता. त्याचप्रमाणे तेली समाजाची २ लाख मते भाजपाला मिळतील, असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारानंतर निर्माण झाला होता. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचा उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीची मते विभागणार, अशी आशा देखील भाजपला होती. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना झालेली प्रचंड गर्दी आणि या निवडणुकीच्या संग्रामात शिवसेनेची अनुपस्थिती भाजपचा उत्साह वाढविणारी ठरली.

सोबतीने मुबलक साधनसामुग्री आणि प्रशासन यंत्रणा दिमतीशी असल्याने भाजपाला विजयाचा पूर्ण विश्वास होता. कारण मागील निवडणुकीत येथे भाजप उमेदवाराने (नाना पटोले) १.५० लाख मतांनी विजय मिळवला होता. परंतु यावेळेस मात्र केवळ ५३% मतदान झाल्याने भाजपच्या गोटात चिंता वाढली.

परंतु ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या आणि मधुकर कुकडे यांची स्वच्छ प्रतिमा व एकगठ्ठा कुणबी मतांचे पाठबळ यांमुळे भाजपच्या विजयाच्या आशा धूसर झाल्या. गोंदिया येथील एका भाजप नेत्याच्या मते, सरकारविषयी शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष, पेट्रोल आणि डिझेलचे गगनाला भिडणारे दर यांमुळे जनतेत भाजपबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली. त्यामुळेच एरवी भाजपच्या पाठीशी असणाऱ्या तेली समाजाने या खेपेस आमच्या विरोधात मतदान केले, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली.

पराभूत उमेदवार हेमंत पटले आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “बहुजन समाजवादी पार्टी यावेळेस निवडणुकीच्या मैदानात नसल्याने मतांचे ‘विभाजन’ झाले नाही. तसेच उष्णतेच्या झळांनी मतदानाची टक्केवारी घटली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा मुकाबला ‘भाजप विरुद्ध इतर सर्व’ असा असल्याने आमचा पराभव झाला.”

—Swapnil Bhogekar

Advertisement