नागपूर: ज्या वस्तीसाठी सफाई कर्मचार्याची नियुक्ती झाली, त्या वस्तीत मनपाने प्रमाणित केलेली नोंदवही ठेवा व संबंधित वस्तीतील नागरिकांची स्वाक्षरी झाल्यानंतरच वेतन द्या. हा निर्णय संपूर्ण नागपूरसाठी लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मनपा प्रशासनाला दिले. तसेच मोकाट कुत्रे आणि मोकाट डुकरांच्या त्रासाने नागरिक हैराण असल्याचे या कार्यक्रमात दिसले.
लक्ष्मीनगर झोनच्या दरबारात नागरिकांच्या सफाईबाबत आलेल्या प्रचंड तक्रारीनंतर हा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती अध्यक्ष विक्की कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, सभापती प्रकाश भोयर, ज्येष्ठ नेते राजीव हडप, किशोर वानखेडे, नगरसेवक प्रमोद तभाने, लक्ष्मी यादव व अन्य नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.
सफाई होत नाही, कचरा उचलला जात नाही, तक्रारी करूनही कारवाई होत नाही अशा तक्रारी टाकळी सिम, जयताळा व अन्य अनेक भागातून नागरिकांनी यावेळी केल्या. राजेश तुरकर या नागरिकाने नाल्यातील घाण पाणी वाहात असल्यामुळे दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. सफाई कर्मचार्याला सूचना दिल्यानंतरही ते येत नाही. जयताळा भागातील कचरा उचचला जात नाही. खुल्या भूखंडांवर लोक कचरा फेकतात, स्वच्छता निरीक्षकांना माहीत असूनही त्यावर कारवाई होत नाही. स्वच्छता निरीक्षक कधीच वस्तीत येऊन पाहात नाही. सफाई कर्मचार्यांच्या भरोशावर झोनचे काम चालते, याकडेही नागरिकांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
तक्रारकर्ते नागरिक आणि अधिकारी यांच्या समोरासमोर तक्रारींचा निपटारा पालकमंत्री करीत असताना आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या कारवाईला अनेकदा नागरिकांनी खोटे ठरविले. यावर पालकमंत्र्यांनी खोटी माहिती दिली तर वेतनात कपात करण्याचे निर्देश देण्यात आले. साफसफाईनंतर अतिक्रमणाच्या तक्रारी मोठ्या संख्येत आल्या. अनधिकृत बांधकाम झालेले अतिक्रमण हटविणे, रस्त्यावर भाजीवाल्यांच्या दुकानाचे अतिक्रमण हटविणे या तक्रारीं नागरिकांनी केल्या. या तक्रारींवर पालकमंत्र्यांनी सांगितले की, अतिक्रमण हटविण्याची कारवाई सतत सुरु ठेवा. जोपर्यंत दररोज कारवाई होणार नाही, तोपर्यंत अतिक्रमणे थांबणार नाही. जप्त केलेले सामान परत देऊ नका आणि प्रत्येक झोनना कारवाईसाठी झोनचे स्वतंत्र पथक निर्माण करावे. पोलिस बंदोबस्त्याची गरज असल्यास त्वरित देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
मोकाट कुत्रे आणि डुकरांच्या त्रासाने हैराण झाल्याच्या तक्रारी सोनेगाव, जयताळा, खामला या भागातील नागरिकांनी केल्या. कुत्र्यांच्या ओरडण्यामुळे अक्षरश: अनेक दिवसांपासून झोप लागत नसल्याची तक्रार करण्यात आली. डुकरांना वस्तीतच पकडून कापले जाण्याची तक्रार एका महिलेने केली असून या संदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या उत्तराने नागरिकांचे समाधान झाले नाही. पालकमंत्र्यांनी कठोर कारवाईचे संकेत आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना दिले.
दीक्षाभूमीसमोर फुटपाथवर पुस्तके व अन्य साहित्य विक्री करणार्यांनी व्यवसायासाठी जागेची मागणी यावेळी केली असता दीक्षाभूमीच्या आराखड्यात व्यवसायाची व्यवस्था करण्याचे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. दुबे लेआऊटजवळी परफेक्ट सोसायटीतील नागरिकांचा रस्त्याचा आणि लेआऊटच्या वादावर 15 दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. लोककर्म विभागाच्या अधिकार्यांना अतिक्रमण दिसत असताना, तक्रारी आल्या असताना कारवाई केली जात नाही, हे आज स्पष्ट झाले.
या जनसंवाद कार्यक्रमात 40 तक्रारी आल्या होत्या. जनसंवाद कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत बर्याच तक्रारी अधिकार्यांनी सोडवल्या होत्या. कारवाई केल्याचे आढळून आले.