नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी तिरुपती लाडू वादाशी संबंधित याचिकांवर सुनावणी पार झाली. देवाला राजकारणापासून दूर ठेवा,अशी टिप्पणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली आहे.सुप्रीम कोर्टाने या काळात आंध्र प्रदेश सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
ज्या तूपाची चाचणी करण्यात आली ते तूप नाकारण्यात आल्याचे लॅबच्या अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय न्यायालयाने राज्य सरकारला विचारले की, एसआयटी तपासाचे आदेश दिल्यानंतर पत्रकारांकडे जाण्याची काय गरज होती?
सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील राजशेखर राव यांनी न्यायालयाला सांगितले की, ते येथे एक भक्त म्हणून आले आहेत आणि प्रसादातील दूषिततेबाबत प्रेसमध्ये केलेल्या वक्तव्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे इतर अनेक समस्या उद्भवू शकतात निर्माण होऊन जातीय सलोखा बिघडू शकतो. ही चिंतेची बाब आहे. देवाच्या प्रसादावर प्रश्नचिन्ह असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केंद्र सरकारला चौकशी प्रक्रियेसंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने आपला तपास पुढे चालू ठेवायचा आहे की नाही? याबाबत केंद्राला विचारणा करण्यात आली आहे. येत्या ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत राज्य सरकारला जैसे थे स्थिती ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी यासंदर्भातल्या पुराव्याची मागणी केली. प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरले गेले होते, याचा काय पुरावा आहे? अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली.
दरम्यान आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी सरकारच्या काळात तिरुमला मंदिराच्या प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसाद मध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा आरोप आहे. त्यात म्हटले आहे की लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या गाईच्या तुपाच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेच्या विश्लेषणात स्वयंपाकात वापरण्याची डुकराची चरबी, टॅलो (गोमांस चरबी) आणि माशाचे तेल आढळून आले.