नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या निवासस्थानातील केलेले ठिय्या उपोषण अखेर नवव्या दिवशी मंगळवारी मागे घेण्यात आल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले. आयएएस अधिकाऱ्यांनी अघोषित संप मिटवावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होते.
हे उपोषण संपावे यासाठी कोणीच पुढचे पाऊल टाकायला तयार नव्हते. यामध्ये नायब राज्यपाल नजीब जंग मागे हटायला तयार नव्हते. तसेच आयएएस अधिकारीही संप मागे घेण्यास तयार नव्हते. अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे कबूल केल्याने उपोषण मागे घेतले असावे असे सांगण्यात येत आहे. यासाठी मध्यस्थाने केलेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर हे उपोषण संपवण्यात यश आल्याचे सुत्रांकडून कळते.
दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना नायब राज्यपालांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या या उपोषणावरुन झापले होते. तुम्ही तुमचे आंदोलन एखाद्या घरात किंवा कार्यालयात कसे काय करू शकता? तुमचे आंदोलन सुरु करण्यापूर्वी तुम्ही नायब राज्यपालांची परवानगी घेतली होती का? असे प्रश्न हायकोर्टाने केजरीवाल आणि इतर मंत्र्यांना विचारले होते.