नागपूर : शहरातील खापरखेडा येथील एका फार्महाऊसमध्ये एक मृतदेह जळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी १०:३० वाजता घडली.
ललित सुखाराम वस्त्राणे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो खापरखेडा वॉर्ड क्रमांक ३ येथील रहिवासी आहे. तो खापरखेडा पॉवर हाऊसमध्ये डोजर ऑपरेटर म्हणून काम करत होता. ललितने आत्महत्या का केली यासंदर्भात प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ललितला दारू पिऊन डोजर मशीन चालवताना अनेक वेळा पकडण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्याला कामावर येण्यापासून रोखण्यात आले होते.
शुक्रवारी मृत ललितला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणी तक्रार नोंदवायची होती, परंतु तो दारू पिलेला असल्याने त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याचीही माहिती आहे. या प्रकरणावरून त्याचे पत्नीशी वाद झाले आणि रागाच्या भरात त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
घटनास्थळाजवळ एका व्यक्तीचे पाच एकराचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये अभिषेक जगणे नावाचा एक व्यक्ती काम करतो. अभिषेक जेव्हा फार्म हाऊसमध्ये गेला तेव्हा त्याला बाईक आणि तो माणूस जळताना दिसला. त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावले पण तोपर्यंत दुचाकी आणि तो माणूस पूर्णपणे जळून खाक झाला होता. दुचाकीची नंबर प्लेटही जळाली. गाडीच्या चेसिस नंबरवरून मालकाचे नाव उघड झाले.
. पत्नीच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.