नागपूर : केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ५ ते २० जानेवारी या कालावधीत खासदार भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम भक्ती ही मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नागपूरकरांना पंधरा दिवस भक्तीचा मेळा अनुभवता येणार आहे.
उत्साही महिला व पुरुष भजनी मंडळांसाठी नागपुरातील ६ विभागांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार असून संपूर्ण भारत राममय होणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून यंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजनी मंडळांना दोनपैकी एक गीत श्रीरामाचे गायचे आहे. तर दुसरे गीत हे गोंधळ, जोगवा, अभंग किंवा कुठलेही भक्तिगीत चालणार आहे. एकूण दोन गीते १० मिनीटांच्या अवधीत सादर करायचे आहे. महाअंतिम फेरीसाठी सहा विभागांतून प्रत्येकी दोन अशा एकूण १२ भजनी मंडळांची निवड होईल. २० जानेवारी २०२४ ला रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते विजयी मंडळांना रोख पुरस्कार आणि गौरवचिन्ह प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
भजन स्पर्धेच्या दक्षिण पश्चिम विभागाच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन वर्धा मार्गावरील छत्रपती सभागृहात ५ जानेवारी २०२४ ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई गडकरी यांचे हस्ते होणार आहे. पश्चिम विभागाची स्पर्धा ६ जानेवारीला रामनगर येथील श्रीराम मंदिरात, पूर्व विभागाची स्पर्धा ७ जानेवारीला गुरुदेवनगर येथील हनुमान मंदिरात, दक्षिण विभागाची स्पर्धा १२ जानेवारीला, तर मध्य व उत्तर विभागाची स्पर्धा १३ जानेवारीला होईल. दक्षिण, उत्तर व मध्य विभागाची स्पर्धा ग्रेट नाग रोडवरील (शीरसपेठ) श्री संत गुलाबबाबा आश्रम येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी येथे करा संपर्क
इच्छुक भजनी मंडळांना स्पर्धेचे प्रवेशपत्र ना. श्री. नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयातून सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत प्राप्त करता येईल. १ जानेवारी २०२४ पूर्वी अर्ज सादर करून प्रवेश निश्चित करायचा आहे. स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे (९७६६५७३८०२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.