Published On : Fri, Jan 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन रविवारी

15 दिवस, 55 खेळ, 63 मैदाने, 56 हजार खेळाडू : 1 कोटी 30 लाखांवर रोख पुरस्कार
Advertisement

पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन रविवारी, पी.टी. उषा, मिताली राज यांची विशेष उपस्थिती, प्रत्येक खेळाडूचा 2 लाखांचा विमा

नागपूर. मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून स्थानिक स्तरावरील क्रीडापटूंसाठी आयोजित देशातील पहिल्या ठरलेल्या खासदार महोत्सवाच्या पाचव्या पर्वाला 8 जानेवारी 2023 पासून सुरूवात होत आहे. रविवारी 8 जानेवारी 2023 रोजी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर सायंकाळी 5.30 वाजता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष माजी धावपटू पी.टी. उषा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री श्री. गिरीश महाजन यांची उपस्थिती असेल, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी शुक्रवारी (ता. 6) पत्रकार परिषदेत दिली.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. सुधीर दिवे, खासदार क्रीडा महोत्सव समितीचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, डॉ. विवेक अवसरे, डॉ. पद्माकर चारमोडे, आशिष मुकीम, अशफाक शेख, अमित संपत आदी उपस्थित होते.

नागपुरातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरलेले हे खासदार क्रीडा महोत्सव 8 ते 22 जानेवारी 2022 पर्यंत चालेल. शहरातील वेगवेगळ्या भागांमधील 63 मैदान अथवा क्रीडा स्थळी तब्बल 55 खेळ खासदार क्रीडा महोत्सवात खेळले जातील. विशेष म्हणजे, यंदाच्या महोत्सवात विदर्भस्तरीय स्पर्धा सुद्धा घेण्याचा निर्णय खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे घेण्यात आलेला आहे. विविध 55 खेळांमध्ये विदर्भस्तरावर 5 स्पर्धा आणि महाराष्ट्र स्तरावर 1 स्पर्धा घेण्यात येणार आहे. विदर्भस्तरीय कबड्डी, खो-खो, अथेलेटिक्स, कुस्ती आणि सायकलिंग या पाच स्पर्धा होणार आहेत. तर महाराष्ट्र स्तरावरील आमंत्रित सीनिअर बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात येईल.

केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले खासदार क्रीडा महोत्सव केवळ नागपुरातील खेळाडूंसाठीच नव्हे तर आता संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी सुद्धा महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वात विजेत्यांना एकूण 1,30,87,743 रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत.

स्थानिक स्तरावर 16 वर्षाखालील मुले आणि मुलींची बास्केटबॉल स्पर्धा होईल. 9 ते 14 जानेवारी या कालावधीत हनुमान नगर क्रीडा मंडळ आणि प्लेअर्स बास्केटबॉल जिमखाला, गाडीखाना येथे स्पर्धा घेण्यात येईल. आमंत्रित महाराष्ट्र बास्केटबॉल स्पर्धेचे सामने नूतन भारत युवक संघ आणि नागपूर अॅमेच्यूअर स्पोर्ट्स असोसिएशनच्या कोर्टवर 15 ते 21 जानेवारी दरम्यान होतील. बास्केटबॉलमधील विजेत्यांना एकूण 3,88,000 हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत.

विदर्भस्तरीय स्पर्धांची सविस्तर माहिती :

अॅथलेटिक्स : पुरस्कार राशी – 7,95,900 रू.

पुरूष आणि महिला खुला गट, मुले व मुली – U/12, U/14, U/16, U/18 आणि 35 वर्षावरील वयोगट. स्पर्धा स्थळ : विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर. 8 ते 13 जानेवारी 2023.

कबड्डी : पुरस्कार राशी – 5,58,000 रू.

मुले व मुली : ज्यूनिअर, सबज्यूनिअर आणि सीनिअर महिला व पुरूष गट.

स्पर्धा स्थळ : विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर. 8 ते 17 जानेवारी 2023.

सायकलिंग : पुरस्कार राशी – 1,59,200 रू.

मुले व मुली : U-12, U-15 आणि U-21 वयोटगट

स्पर्धा स्थळ : दीक्षाभूमी चौक. 8 जानेवारी 2023. सकाळी 5.30 वा.

खो-खो : पुरस्कार राशी – 3,45,000 रू.

महिला व पुरूष खुला गट आणि U-14 मुले व मुली

स्पर्धा स्थळ : विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर. 8 ते 12 जानेवारी 2023.

कुस्ती : पुरस्कार राशी – 2,00,000 रू.

युथ गट – मुले 35 ते 54 किलो, खुला गट – 53 व 75 किलोवरील. महिला 35 ते 63 किलो वरील गट.

स्पर्धा स्थळ : भवानी माता मंदिर, पारडी पुनापूर. 19 आणि 20 जानेवारी 2023.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वात सहभागी सर्व खेळाडूंचा एक वर्षासाठी 2 लाख रुपयांचा विमा काढण्यात आलेला आहे. विमा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही स्पर्धांमधील सर्व खेळाडूंनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या www.khasdarkridamahotsav.com या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करण्यात येईल.

7 जानेवारी 2023 पर्यंत सर्व क्रीडा प्रकारांची नोंदणी करण्यात येईल, तसेच ओ वुमनिया, ज्येष्ठ नागरिक महोत्सव व 22 जानेवारीला होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेकरिता नोंदणीची अंतिम तारीख 12 जानेवारी राहील.

क्रीडा भूषण पुरस्कारासाठी 16 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

खासदार क्रीडा महोत्सवामध्ये क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 25 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करणे अनिवार्य असून 16 जानेवारी 2023 पर्यंत सीताबर्डी येथील खासदार क्रीडा महोत्सवाच्या ग्लोकल मॉल येथील कार्यालयात अर्ज सादर करावे. याशिवाय क्रीडा क्षेत्रात विशेष योगदान देणा-या एका व्यक्तीचा क्रीडा महर्षी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येतो. पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवात ज्येष्ठ क्रीडा संघटक दिवंगत सरदार श्री. अटल बहादूर सिंग, दुस-या महोत्सवात ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री. भाउ काणे, तिस-या महोत्सवात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. शशांक मनोहर आणि चवथ्या महोत्सवात ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री. बबनराव तायवाडे यांना क्रीडा महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 5 लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वातही क्रीडा क्षेत्रातील एका व्यक्तीला क्रीडा महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही यावेळी श्री. संदीप जोशी यांनी सांगितले.

खासदार क्रीडा महोत्सव-5

15 दिवस

55 खेळ

63 मैदाने

2280 संघ

5000 ऑफीशियल्स

56,000 सहभागी खेळाडू

12020 सामने

688 ट्रॉफी

11,939 मेडल्स

पुरस्कार राशी ₹ 1,30,87,743

Advertisement