नागपूर: भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सर्व भारत स्वस्थ होण्याकरिता ‘खेलो इंडिया’ च्या माध्यमातून शालेय विदयार्थ्यांना क्रिडा प्रकारांमध्ये सहभाग होण्यासाठी प्रोत्साहन दिले. याचप्रमाणे, सर्व नागरिकांनी शारिरिकदृष्टया स्वस्थ राहण्याकरिता स्वत:हून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी आज नागपुर येथे केले.
स्थानिक मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात आयोजित 6 मे ते 26 मे पर्यंत चालणा-या वीस दिवसीय खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, ख्यातनाम बॅडमिंटन प्रशिक्षक पद्मश्री व पद्भूषण श्री. पी. गोपीचंद, प्रसिध्द अभिनेता श्री. अक्षय कुमार, महापौर श्रीमती नंदा जिचकार, नागपूर महानगर पालिकेचे सत्तापक्ष नेते व या महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री. संदीप जोशी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर हे ख-या अर्थाने नंबर एकचे शहर असून येथील खासदार क्रीडा महोत्सवात भारत सरकारचे नंबर एक मंत्री श्री. गडकरी, नंबर एक प्रशिक्षक श्री. गोपीचंद व नंबर एक सिने अभिनेता व खिलाडी अक्षय कुमार उपस्थित आहेत, अशी भावना श्री. राठोड यांनी यावेळी व्यक्त केली. यापूर्वी 16 ते 17 वयोगटातील शालेय विदयार्थ्यासाठी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन ‘खेलो इंडिया’ मार्फत केले जात होते. पण आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाव्दारे 8ते 10 वयोगटातील 1 कोटी शालेय विदयार्थ्यांची चाचणी घेऊन त्यातील 20 हजार विदयार्थ्यांची निवड करून व त्यांचीही शारिरिक चाचणी करून 2024 मध्ये येणा-या ऑलंपिक स्पर्धेसाठी त्यांना आतापासूनच प्रशिक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नल राठोड यांनी याप्रसंगी दिली.
नागपूर मध्ये रस्ते, मेट्रो, विविध विकास प्रकल्प या पायाभूत संरचनांचा विकास होत असतानांचा क्रीडा, स्वास्थ, शिक्षण अशा सांस्कृतिक संरचनेच्या विकासातही नागपूर शहर हे अग्रेसर राहत आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून सुमारे 30 हजार खेळाडू नागपूरात आयोजित होणा-या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. नागपूरातील खेळाडूंमध्ये हुनरची कमतरता नाही, त्यांच्या या क्रीडा नैपुण्य व सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील तीन महान व्यक्तीमत्व – भारताचे ऑलंपीक पदक विजेते व भारताचे केंद्रीय राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, उत्कृष्ठ प्रशिक्षक श्री. पी. गोपीचंद व असंख्य खेळाडूंना प्रोत्साहित करणारे खिळाडू वृत्तीचे अभितेते श्री. अक्षय कुमार यांना आज आमंत्रित केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे नागपूरातील भारतीय क्रीडा प्राधिकरण(साई)या संस्थेची स्थापना सुमरे 120 कोटी रुपयाच्या तरतुदीने करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. अक्षय कुमार यांनी 20 हजार विदयार्थीनींना स्वरक्षणासाठी कराटे, ज्युडो यांचे प्रशिक्षण देऊन वाखण्याणाजोगे कार्य केले असल्याचेही श्री. गडकरी यांनी नमूद केले. नागपूरातील सर्व क्रीडा मंडळ, स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन यशस्वी होण्या करिता सर्व नागरिकांनी क्रीडा सामान्यात उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दयावे, असे आवाहनही श्री. गडकरी यांनी केले.
भारतात गेल्या 50 वर्षामध्ये केवळ शालेय साक्षरतेवरच भर दिला गेला पण यासोबतच सर्वांगीण व्यक्तीमत्वासाठी शारिरिक शिक्षणावरही भर देणे गरजेचे आहे. अन्य देशातील क्रीडा प्रकारात नैपुण्य साधण्याऐवजी आपल्या देशातील क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य साधून खेळाडूंनी नवे विक्रम प्रस्थापित करावेत, असे आवाहन बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद योनी केले.
मी आधी एक खेळाडु व स्टंटमॅन असून त्यानंतर एक सिने अभिनेता आहे. आपल्या पाल्यांना खेळ क्रीडा यांमध्ये सहभागी होण्यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन प्रोत्साहन दिले पाहिजे, प्रत्येकांनी ‘आय एम द चॅम्पियन’ हा मंत्र लक्षात ठेऊन आपल्या क्रीडा प्रकारात नैपुण्य साधले पाहिजे, असे आवाहन सिने अभिनेता श्री. अक्षय कुमार यांनी केले.
खासदार क्रीडा महोत्सवात विविध क्रीडाप्रकाराचे आयोजन
नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला खासदार क्रीडा महोत्सव हा स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित केलेला एक भव्य कार्यक्रम असून या 20 दिवसीय महोत्सवात 20 खेळ प्रकार, 31 जागा, 294 कार्यक्रम, 540 संघ, 880 प्रशिक्षक, 1500 पंच यांचा समावेश आहे. या महोत्सवात 25 हजार खेळाडू सहभागी होणार असून यादरम्यान 4643 सामने खेळल्या जातील व सुमारे 62 लक्ष रुपयाचे पुरस्कार वितरित केले जातील , अशी माहिती नागपूर महानगर पालिकेचे सत्तापक्ष नेते व या महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री. संदीप जोशी यांनी दिली.
या क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री (स्व.प्र.) व केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी खेळांडूंना शपथ दिली. अर्जृन अवार्ड विजेते श्री. विजय मुनीश्वर यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.उद्घाटन समारंभात योगा, शिवकालीन युद्धप्रकार, रोप मल्लखांब, शरीर सौष्ठवचे प्रात्याक्षिक तसेच लेझिम पथक यांचे रोमांचकारी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. याप्रसंगी फुटबॉल, खोखो, लॉनटेनिस, बास्केटबॉल,कॅरम, स्केटींग, अॅथेलीटक्स, स्विमिंग, बॅडमिंटन, हॉकी, बुद्धीबळ, कबड्डी,
टेबल टेनीस सायकलींग, गर्ल्स क्रिकेट, कुस्ती, बॉडि-बिल्डिंग, वौकेथॉन या स्पर्धाच्या संघांनी मान्यवरांसमोर पथसंचलनही केले.
या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी शहरातील विविध क्रीडामंडळाचे खेळाडू,प्रशिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगर पालिका व जिल्हा प्रशासनाचे पदाधिकारी व नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.