स्थानिक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक मिळविणे हाच महोत्सवाचा उद्देश : ना. नितीन गडकरी
पी.टी.उषा, मिताली राज, उमेश यादव यांची विशेष उपस्थिती
नागपूर : रस्ते, पाणी, वीज याउपर शहराचा सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात विकास करण्याच्या हेतूने खासदार क्रीडा महोत्सवाची संकल्पना पुढे आली. आपल्याकडे प्रतिभेची कमी नाही. या प्रतिभावंतांना प्रोत्साहन देऊन त्यांना खेळण्याची संधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास पुढे देशाचे नावलौकीक करणारे अनेक खेळाडू पुढे येतील. आपल्या शहरातील खेळाडूंनी देशाचे नाव लौकीक करणे यातच खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्देश साध्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केले.
मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्थानिक स्तरावरील क्रीडापटूंसाठी आयोजित देशातील पहिल्या ठरलेल्या खासदार महोत्सवाच्या पाचव्या पर्वाचे रविवारी (ता.8) मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष माजी धावपटू पी.टी. उषा, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज आणि भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव यांच्या हस्ते उदघाटन झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, समीर मेघे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, पी.टी. उषा यांचे पती श्रीनिवास, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर दिवे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वातील संपूर्ण चमू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, खेळाडू यांचे अभिनंदन केले. सर्वांच्या सहकार्याने शांतीपूर्णरित्या देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव यशस्वी होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. वेगवेगळ्या बाबतीत नागपूर शहर विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. फुटाळ्यातील म्युझिकल फाऊंटेन हे त्यातील एक मोठे पाऊल आहे. खासदार क्रीडा महोत्सवातील खेळाडूंसाठी फाऊंटेनचे विशेष आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खेळामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख : मिताली राज
खेळाडूला रोज नवीन संधी खेळामुळे मिळते. स्वतःची निर्णयक्षमता विकसित करण्यासोबतच रोज नवी आशा आणि संधी खेळ घेऊन येतो. मागील 23 वर्ष देशासाठी खेळत असताना खेळाने कधीही न हरण्याची शिकवण दिली आहे. प्रत्येक खेळाडूला ‘स्पोर्ट्स’ स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी प्रदान करते, असे प्रतिपादन भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज यांनी केले.
प्रोफेशनल खेळाडू पासून ते ज्येष्ठ आणि चिमुकल्यांचा सहभाग असलेला खासदार क्रीडा महोत्सव प्रत्येक खेळाडूला समान संधी प्रदान करतो. या भव्य महोत्सवाची साक्षीदार होता आल्याचा आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक खेळाडूंना संधी देण्यासाठी भव्य क्रीडा महोत्सवाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना प्रेरणादायी असल्याचेही त्या म्हणाल्या. मागील काही वर्षात खेळाचा विकास झपाट्याने होत आहे. खेळातील आपले सातत्य आणि मेहनत आपल्याला आपले करिअर विकसित करण्याची संधी प्रदान करते. असे महोत्सव खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ असून या महोत्सवात सहभागी होणारे आजचे खेळाडू उद्या जगातील दिग्गज खेळाडू ठरतील, असा विश्वास देखील मिताली राज यांनी व्यक्त केला.
नागपूरने ओळख दिली : पी.टी. उषा
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष या सध्याच्या ओळखीपूर्वी देशाला धावपटू ही ओळख करून देणारे नागपूर शहर असल्याची आठवण यावेळी पी.टी. उषा यांनी सांगितली. 14 वर्षाची असताना नागपुरात राष्ट्रीय स्पर्धेत 100, 200 मीटर दौड आणि 100 मीटर अडथळा शर्यतीत तीन सुवर्णपदक पटकाविले. येथूनच पुढे जिंकण्याचे प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी अनेक महत्वाचे पुढाकार घेतले जात असल्याचे त्या म्हणाल्या. स्थानिक स्तरावर खेळाडूंच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्फत होत असलेले कार्य हे खेळाडूंच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी महोत्सवाच्या मागील चार वर्षांच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. पहिल्या वर्षी 26 खेळांपासून सुरू झालेला महोत्सव आज 55 खेळांपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे. या वर्षी खेळाडूंचा प्रचंड मोठा प्रतिसाद असून सर्व खेळाडूंचा विमा काढण्यात आला आहे. ज्येष्ठांचा एक दिवसीय क्रीडा महोत्सव असून ज्येष्ठांचा सुद्धा विमा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पी.टी. उषा यांनी मशाल प्रज्वलित करून महोत्सवाचा शुभारंभ केला. राष्ट्रीय योगा स्पर्धेत तीन सुवर्ण पदक विजेता वैभव श्रीरामे याने पी.टी. उषा यांना मशाल सुपूर्द केली. मिताली राज यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण केले. उमेश यादव यांनी खेळाडूंना शपथ दिली. महोत्सवातील सर्व स्पर्धांच्या पथकाने पथसंचलनातून मान्यवरांना मानवंदना दिली. विशेष म्हणजे, दिव्यांग खेळाडूंच्या पथसंचालनाला उपस्थित मान्यवर आणि उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून प्रोत्साहन दिले.
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी पी.टी. उषा, मिताली राज आणि उमेश यादव यांचे स्वागत केले.
यावेळी आखाडा, मलखांब, रोप मलखांब, दानपट्टा, योगा, लेझिम च्या खेळाडूंनी थरारक प्रात्यक्षिक सादर केले. खासदार क्रीडा महोत्सवाची चार वर्षाची वाटचाल दर्शविणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
ना. गडकरींच्या चेंडूवर मिताली, उमेशचे फटके
खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या स्वाक्षरीचे चेंडूने ना. नितीन गडकरी यांनी गोलंदाजी केली तर मिताली राज आणि उमेश यादव यांनी प्रेक्षकांत फटके लागवले. पुढे उमेश यादव च्या गोलंदाजीवर ना. गडकरींनी जोरदार बॅटिंग केली.
नागपुरातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरलेले हे खासदार क्रीडामहोत्सव 8 ते 22 जानेवारी 2022 पर्यंत चालेल. शहरातील वेगवेगळ्या भागांमधील 63 मैदान अथवा क्रीडा स्थळी तब्बल 55 खेळ खासदार क्रीडा महोत्सवात खेळले जातील. विशेष म्हणजे, यंदाच्या महोत्सवात विदर्भस्तरीय स्पर्धा सुद्धा घेण्याचा निर्णय खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे घेण्यात आलेला आहे. विविध 55 खेळांमध्ये विदर्भस्तरावर 5 स्पर्धा आणि महाराष्ट्र स्तरावर 1 स्पर्धा घेण्यात येणार आहे. विदर्भस्तरीय कबड्डी, खो-खो, अथेलेटिक्स, कुस्ती आणि सायकलिंग या पाच स्पर्धा होणार आहेत. तर महाराष्ट्र स्तरावरील आमंत्रित सीनिअर बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात येईल.
संचालन माय एफएम चे आरजे आमोद यांनी केले. समितीचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
खासदार क्रीडा महोत्सव-5
15 दिवस
55 खेळ
63 मैदाने
2280 संघ
5000 ऑफीशियल्स
56,000 सहभागी खेळाडू
12020 सामने
688 ट्रॉफी
11,939 मेडल्स
पुरस्कार राशी ₹ 1,30,87,743