नागपूर : पुणे -हटिया एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या दोन किन्नरांना चाैकशीसाठी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर या घटनेतील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध घेणे सुरु आहे. माया आणि सोनल ही अटकेतील आरोपी किन्नरांची नावे आहेत.
या दोन्ही किन्नरांसह इतर दोन किन्नर बुधवारी मध्यरात्री पुणे हटिया एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये हैदोस घालून सिनेस्टाइल लुटमार केली होती. प्रत्येक प्रवाशांकडे दोनशे, पाचशे रुपये मिळावे म्हणून ते घाणेरड्या शिव्या घालत होते. प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसेही हिसकावून घेत होते. बुटीबोरी-खापरी स्थानकापासून सुरू झालेला किन्नरांचा हा हैदोस नागपुरातील अजनी रेल्वे स्थानक येईपर्यंत सुरू होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती प्रवाशांनी अजनी स्थानक येताच रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी राजेशकुमार शर्मा नामक प्रवाशाची तक्रार नोंदवून रेल्वे पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. त्यातील सोनल आणि मायाला अटक करण्यात आली.