मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या व्हिडीओवरून आज विधानपरिषदेत गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( ठाकरे ) गट आमदार अनिल परब यांनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेत केली.
राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
या प्रकरणी पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही.अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही. सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.