कर्मचाऱ्यांचे मान्सूनपूर्व प्रशिक्षण
नागपूर: पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात शहरात अनेक जलजन्य व किटकजन्य आजार पसरण्याची शक्यता असते. त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा व हिवताप व हत्तीरोग विभाग सतत कार्यरत असतो. हे किटकजन्य आजार शहरातून हद्दपार करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग कटीबद्ध आहे.
त्या दृष्टीने हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत शहरातील सर्व हिवताप अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, हिवताप निरिक्षक, एस.एफ.डब्ल्यु. आणि इतर कर्मचाऱ्यांची मान्सूनपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयोजित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आरोग्य समिती सदस्य वीरेंद्र कुकरेजा, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ.मिलिंद गणवीर, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आरोग्य समिती सदस्य वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, शहरात अशा प्रकारच्या आजाराचा प्रसार होउ नये यासाठी कर्मचाऱ्यांना जागृत राहणे आवश्यक आहे. आजार जेथून उत्पन्न होईल अशा आपापल्या प्रभागातील स्थानांना हेरून ठेवणे व त्याठिकाणी वेळोवेळी फवारणी करणे गरजेचे आहे. त्याठिकाणच्या स्थानिक नागरिकांना याबाबत अवगत करून त्यांचेही सहकार्य घेण्याचे आरोग्य समिती सदस्य वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले. या आजारांबाबात योग्य त्या माध्यमातून जनजागृती व्हायला हवी. जेणेकरून नागरिकांना आजारांबाबत योग्य माहिती मिळत राहील. रोगप्रतिबंध उपाययोजना करण्याकरिता व त्याची जनजागृती व्हावी यासाठी व्हिडिओ तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी बोलताना आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ.मिलिंद गणवीर यांनी एच१बी१सी१ हे इंडेक्स कशा स्वरूपात काढायचे व त्याचे प्रमाण किती असायला हवे याची माहिती दिली. आजाराचा प्रसार होणार नाही यासाठी काय उपाययोजना करायला हव्या, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी विभाग प्रमुख जयश्री थोटे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर जयश्री थोटे यांनी विभागामार्फत सुरू असलेल्या उपाययोजना व कार्यस्वरूप तसेच कर्तव्यसूची पीपीटीद्वारे सादरीकरण केले.
कार्यक्रमाला विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.