नागपूर :गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरातील नरेंद्र नगर परिसरातील टाइनी टॉट्स स्कूल जवळ एका विकृत माणसाच्या कृत्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहे. या व्यक्तीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. प्रत्येक दिवशी हा व्यक्ती हातात चाकू घेऊन परिसरातील लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देतो. तसेच शिवीगाळ करून त्यांना घाबरवतो. या माणसाच्या वागण्यामुळे स्थानिक महिलांमध्येही भीती पसरली असून रात्री-बेरात्री महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ‘नागपूर टुडे’ने या घटनेवर प्रकाश टाकला.
कोण आहे हा विकृत ?
आर्मी मधून सेवानिवृत्त झालेला हा व्यक्ती आहे. देशमुख असे या इसमाचे नाव नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी देशमुख विरोधात अनेक बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांकडून त्याच्या विरोधात अद्यापही कोणतीच कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस विकृत देशमुखला काही वेळासाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि लगेच सोडून देतात,अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.
स्थानिकांकडून पोलिसांना विकृताविरोधात कठोर कारवाईची मागणी –
नरेंद्र नगर परिसरातील नागरिकांनी एकजूट होत विकृत देशमुख विरोधात कठोर कारवाईची मागणी पोलिसांना केली. आता यावर पोलीस काय ऍक्शन घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.