जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार
नागपूर : अशोक कोल्हटकर हे नागपूर महानगरपालिकेला लाभलेले लोकप्रिय जनसंपर्क अधिकारी म्हणून ओळख पावले आहेत. कामाला प्राधान्य देउन ते पूर्ण करण्यासाठी धडपडणारा अधिकारी म्हणून ते पदाधिका-यांसह प्रशासनामध्येही परिचित आहेत. जनसंपर्क अधिकारी पदावर असणारे प्रेम आणि पदासोबत समरस होण्याची त्यांची शैली ही कौतुकास्पद आहे. कोणत्याही कामाला हमखास पूर्ण करणारा कर्तव्याप्रति निष्ठा असणारा अधिकारी म्हणूनच अशोक कोल्हटकरांची ओळख कायम राहिल, या शब्दांमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्या कार्याचा गौरव केला.
नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी पदावर कार्यरत अशोक कोल्हटकर यांचा शुक्रवारी (ता.३१) सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेवक सर्वश्री संजय महाजन, परसराम मानवटकर, नितीन साठवणे, किशोर जिचकार, नगरसेविका कल्पना कुंभलकर, विद्या मडावी, अभिरुची राजगिरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, निगम सचिव हरीश दुबे, कार्यकारी अभियंता अनिल कडू, निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, कर्मचारी नेते राजेश हाथीबेड उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते अशोक कोल्हटकर यांचा शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप आणि भेटवस्तू व त्यांच्या पत्नी पमिता कोल्हटकर साडीचोळी देउन सत्कार करण्यात आला.
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, हमखास निकाल देणारा अधिकारी म्हणून अशोक कोल्हटकरांवर मी नेहमी विश्वास ठेवला व प्रत्येकवेळी त्यांनी ते सार्थक ठरविले. जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकरांचा कार्यकाळ चांगला राहिला. निवृत्तीमध्ये गालबोट लागू नये, निवृत्तीनंतर समाधानी आयुष्य जगता यावे यामध्येच जीवनाचे खरे सार आहे. कुटुंबाच्या सहकार्यामुळे यामध्येही कोल्हटकर खरे उतरले. मनपाच्या सेवेमधून निवृत्त होत असले तरी कोल्हटकरांसोबत मनपाचे नाते कायम राहिल, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी अशोक कोल्हटकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नाविण्यपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना मांडून ते यशस्वीरित्या घडवून आणण्याची शैली असलेला अधिकारी अशोक कोल्हटकर आहे, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनीही त्यांचा उत्कृष्ठ अधिकारी म्हणून आपल्या भाषणातून गौरव केला. अशोक कोल्हटकर यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि कुठल्याही कार्यात पुढाकार घेणा-या अधिका-याची उणीव नेहमीच भासेल, असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नागपूर महानगरपालिकेने माझ्यावर पालक म्हणून प्रेम केले आहे. या ऋणाची उतराई करणे शक्य नाही. मी आज सेवानिवृत्त होत असलो तरी जेव्हा गरज पडेल किंवा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी सेवा देण्यासाठी तत्पर असेल, असे सांगताना आपल्या सेवाकाळातील कटू-गोड अनुभवांना त्यांनी उजाळा दिला. अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख आणि निगम सचिव हरीश दुबे यांनीही जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक उपस्थितांनी त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देउन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन आनंद आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क विभागाचे राजेश वासनिक, दिलीप तांदळे, राकेश चहांदे, सागर कावलकर, नितीन फुल्लुके, मधुरा बोरडे, गणेश नारनवरे, विनोद डोंगरे, देवराव गेडाम, राजू मेश्राम, गौरव बिसने, गजेंद्र चंद्रशेखर, अविनाश कोसरकर, नरेंद्र रामटेके, फुलचंद चंदनखेडे, शिवशंकर गौर, रंजीत घरडे, तेजराम बडगे आदींनी सहकार्य केले.