पुणे: कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सरकार आपला राजधर्म पाळत असून 9 कोटी 45 लाखांची नुकसान भरपाई लवकरच दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. भीमा कोरेगाव घटनाप्रकरणी सरकार व्यक्ती, जाती, धर्म निरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले.
तसेच या प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्यावर 28 तारखेच्या पत्रकार परिषदेनंतर कारवाई का, झाली नाही, याबाबतही सरकार तपास करत आहे. दोषी आढळणार्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.
एकूण 58 गुन्हे… 162 जणांना अटक
मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी एकूण 58 गुन्हे दाखल केले असून 162 जणांना अटक केली होती. एकाचा मृत्यूही झाला होता. हिंसाचारात 9 कोटी 45 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. दरम्यान महाराष्ट्र बंद दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त महासंचालकांची समिती नेमण्यात येईल. समिती तीन महिन्यात अहवाल देईल.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वढू ब्रुद्रुक (ता.शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झाल्यानंतर विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारीला सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली. दोन गटात वाद झाल्याने घोषणाबाजी होऊन वाद चिघळला आणि त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने जाळणे व मालमत्तेचे नुकसान करण्यात झाले.
पाहाता पाहाता पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापूरी या भागात अनेक वाहनांची व दुकानांची नासधूस व तोडफोड करण्यात आली. या घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. काही जण किरकोळ जखमी झाले.