Published On : Tue, Jun 9th, 2020

कोविड-19: ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा -पालकमंत्री

Advertisement

प्लाज्मा बँक तयार करावी

कोविड कचरा व्यवस्थापन निट करा

गर्दीचे व्यवस्थापन करा

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर: टाळेबंदी हळू हळू शिथिल होत असून मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय व नागरिकांचे आवागमन सुरु होत आहे. ग्रामीण भागात कोरानाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने प्रमाणित कार्यप्रणाली तयार करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोना विषयक कामकाजाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, उद्योग सहसंचालक अ. प्र. धर्माधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागपूर ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत 12 हजार 609 नागरिक आले असून यात मुंबई-पुणे येथून येणाऱ्या 1962 नागरिकांचा समावेश आहे. अन्य ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत असून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक असून यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पावसाळ्यात साथ रोगाची लागण होण्याची शक्यता पाहता वैद्यकीय यंत्रणा तत्पर ठेवावी, असे त्यांनी सांगितले. जेष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी प्लाज्मा बँक तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीत दोन्ही ठिकाणचा वैद्यकीय आढावा घेण्यात आला. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 2702 उद्योग घटकांना उत्पादन सुरु करण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली. यापैकी 2179 उद्योग घटकात उत्पादन सुरु झाले आहे. सद्यस्थितीत परवानगी प्राप्त उद्योगांमध्ये 43 हजार कामगार रुजू झाले आहे, अशी माहिती उद्योग सहसंचालक अ.प्र. धर्माधिकारी यांनी दिली. या विषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, स्थानिकांना रोजगार मिळावा यसाठी प्रयत्न करावे.

या बैठकीत कोरोना विषयी नागपूर शहराचा आढावा घेण्यात आला. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विलिगीकरण कक्ष, निवारा गृह, अन्न वाटप, अत्यावश्यक सेवा उपलब्धतेसंदर्भात केलेल्या उपाय योजना, जंतूनाशक फवारणी, कोविड केअर सेंटर, पॉझिटिव्ह – निगेटिव्ह रुग्ण तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती सादर केली. कोविडच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने व्हावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

शहरामध्ये सुध्दा उद्योगव्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु होणार असून यावेळी होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. आठवडी बाजार व बाजारपेठाबाबत अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री म्हणाले. निर्जंतुकीकरण व सुरक्षित अंतर याबाबतीत तडजोड करण्यात येवू नये अशा कडक सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

Advertisement
Advertisement