नागपूर : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासंदर्भात शिंदे समिती गठीत करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गुरुवारी विभागीय आढावा घेतला. यात, नागपूर विभागात जवळपास ७४ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ८ लाखांवर कुणबी तर कुणबी-मराठा, मराठा-कुणबीचे ५० ते ५५ कागदपत्रे आढळली, अशी माहिती प्रशासनाने शिंदे समितीला दिले.विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात ही बैठक पार पडली.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेप्रमाणेच विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागातही मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान या बैठकीत अपर विभागीय आयुक्त माधवी खोडे-चौरे, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्यासह सर्व जिल्हयांचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते. तसेच विधी व न्याय विभागाचे सहसचिव शेखर मुनघाटे, उपसचिव विजय पोवार, ॲड. अभिजित पाटील, कक्ष अधिकारी माधुरी देशमुख, उमेश आकुर्डे आदीसुद्धा उपस्थित होते.