नागपूर : गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकत लाखो रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून गोदामाचा मालक फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रुपेश अरुण नंदनवार (वय 34, रा. गोळीबार चौक) आणि दत्तू बबनराव सरतकर (वय 38, रा. जुनी शुक्रवार) यांचा समावेश आहे. गोदामाच्या मालकाचे नाव दुर्गेश अग्रवाल, रा. मानकापूर असे सांगण्यात येत आहे.
लकडगंज पोलीस ठाणे हद्दीतील येनूरकर इमारतीच्या पार्किंगमध्ये गोदाम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. येथे परराज्यातून सुगंधी तंबाखू आणून पॅकिंग केले जाते. नंतर तंबाखू पानठेला चालकांना पुरविली जातो.
या बातमीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री गोदामावर छापा टाकला.तपासणीत 22 गोण्यांमध्ये विविध प्रकारचा तंबाखू आढळून आला. तंबाखूचे पॅकिंग करण्यासाठी मशीन्स आणि प्रीटिंग मशीनही येथे बसवण्यात आल्या होत्या. स्वत:चा ब्रँड तयार करून आरोपी शहरात तंबाखूची विक्री करत होते. रिकामी पाकिटे आणि बॉक्सही मोठ्या प्रमाणात आढळून आले. माल पुरवठा करण्यासाठी वापरलेली व्हॅनही पोलिसांनी जप्त केली आहे.
18.54 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकडगंज पोलीस पुढील कारवाई करत आहेत. डीसीपी मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-3चे निरीक्षक महेश सागडे, एपीआय पवन मोरे, पीएसआय मधुकर कोठाके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.