नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये लातुर संघाने दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. 21 वर्षाखालील मुले आणि 18 वर्षाखालील मुलींच्या गटात लातुर संघाने प्रतिस्पर्धी संघांना मात देत विजेतेपद पटकाविले. समर्थ व्यायामशाळा प्रताप नगर येथे ही स्पर्धा पार पडली.
खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा आनंद घेतला. त्यांनी सामना सुरु होण्यापूर्वी खेळाडूंशी हस्तांदोलन केले व शुभेच्छा दिल्या. ना.श्री. नितीन गडकरी यांनी विजेत्यांना पुरस्कार देखील प्रदान केले.
रविवारी रात्री 21 वर्षाखालील वयोगटात मुलांच्या लढतीत लातुर संघाचा सामना मुंबई संघाशी झाली. सामन्यात सुरुवातीपासूनच लातुरने आपला दबदबा कायम ठेवला. मुंबई संघाला 25-18, 26-24, 25-22 ने मात देत लातुरने अंतिम लढतीत वर्चस्व सिद्ध केले. याच वयोगटात पुणे संघाच्या मुलींनी नाशिकचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत अनेक निर्णायक क्षण आले. पण अखेर पुणे संघाने बाजी मारली. पुणे संघाने 25-22, 25-20, 20-25, 25-23 ने सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले.
18 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात लातूर संघाला मुंबई संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामन्यात मुंबईने 28-26, 25-18, 13-25, 25-20 ने लातुरचा पराभव करुन जेतेपद मिळविले. मुलींच्या गटात लातुरने पुणे संघाला नमवून विजेतेपदावर मोहोर उमटविली. लातुरने सुरुवातीपासूनच दबदबा कायम ठेवित 25-11, 25-16, 25-22 ने अंतिम सामना जिंकला.
खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबूलकर, आशिष मुकीम, प्रमोद तभाने, विशाल लोखंडे, नितीन महाजन, सोनाली कडू, शिल्पा कुकडे, व्हॉलिबॉल असोसिएशनचे सुनील हांडे, सौरभ रोकडे उपस्थित होते.
अंतिम निकाल
21 वर्षाखालील मुले
लातूर मात मुंबई 25-18, 26-24, 25-22
मुली
पुणे मात नाशिक 25-22, 25-20, 20-25, 25-23
18 वर्षाखालील मुले
मुंबई मात लातूर 28-26, 25-18, 13-25, 25-20
मुली
लातूर मात पुणे 25-11, 25-16, 25-22