लोकसहभागातून मनपाचा उपक्रम : ५ जूनपर्यंत करणार तीन नद्यांची स्वच्छता
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून उन्हाळ्यात शहरातील मुख्य नद्यांचे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यंदाच्या अभियानाचा शुभारंभ रविवारी (ता. ५) महापौरांसह मनपाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला.
‘नदी स्वच्छता अभियाना’अंतर्गत मुख्यत: शहरातील तीन नद्यांची स्वच्छता करण्यात येते. यात नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदीचा समावेश आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचा नदीतून विनाअडथळा निचरा व्हावा यासाठी दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी सदर अभियान हाती घेण्यात येते. यासोबतच पावसाळी नाल्या व इतर लहान-मोठ्या नाल्यांचीही स्वच्छता करण्यात येते.
यंदा हे अभियान ५ मे रोजी प्रारंभ झाले. सर्वप्रथम सकाळी ७ वाजता वाजता सहकार नगर घाटाजवळील पोरा नदीच्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यानंतर नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ यशवंत स्टेडियमजवळील संगम चाळलगतच्या नाग नदीमध्ये ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या हस्ते करण्यात आला तर पिवळी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ नारा घाट नजिकच्या नदीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, प्रकाश वऱ्हाडे, राजू भिवगडे, महेश मोरोणे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरिश राऊत, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे, डॉ. प्रदीप दासरवार, विभागीय आरोग्य अधिकारी (मुख्यालय) रोहिदास राठोड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता सर्वश्री अमीन अख्तर, राजेश भूतकर, गिरीश वासनिक, आसाराम बोदिले, अनिल नागदेवे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता अजय पाझारे, कमलेश चव्हाण, प्रवीण कोटांगले, शैलेश जांभुळकर, झोनल आरोग्य अधिकारी रामभाऊ तिडके, धनराज रंगारी, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेवक मनोज सांगोळे, नगरसेविका सुषमा चौधरी, उज्ज्वला शर्मा, यांच्यासह ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जयस्वाल, बिष्णूदेव यादव, विकास यादव, दीपक गिऱ्हे, संजय चौधरी आदी उपस्थित होते.
तीनही ठिकाणी प्रारंभी पोकलेनची पूजा करून नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर जेसीबच्या सहाय्याने नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. सफाई कर्मचाऱ्यांनीही नदीत उतरून नदी स्वच्छतेला सुरुवात केली.
सदर अभियान पुढील एक महिना अर्थात ५ जूनपर्यंत चालणार असून संपूर्ण अभियानाच्ळा समन्वयनाची जबाबदारी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात मनपाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणेतील अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून या अभियानात नागपूरकरांनीही मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.