नालंदा वस्ती स्तर संस्था करणार संचालन
नागपूर : महिला बचत गटाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि समाजविकास विभागाच्या वतीने सन २०१९ मध्ये मनपा मुख्यालय परिसरात ‘पोटोबा’ स्टॉलची निर्मिती करण्यात आली होती. दरवर्षी या स्टॉलच्या संचालनासाठी शहरातील नोंदणीकृत बचत गटांची निवड करण्यात येते. आधीच्या बचत गटाला ‘पोटोबा’च्या संचालनासाठी दिलेला कालावधी संपूष्टात आल्यानंतर नवीन बचत गटाच्या नियुक्तीसाठी गुरूवारी (ता.३०) मनपा मुख्यालयात सोडत करण्यात आली.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांच्या उपस्थितीत ईश्वर चिठ्ठीद्वारे मुख्यालयातील ‘पोटोबा’ साठी सोडत काढण्यात आली. यामध्ये नालंदा वस्ती स्तर संस्थेची निवड झाली. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती अर्चना पाठक, सदस्या मंगला लांजेवार, उज्ज्वला शर्मा, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर, शारदा गडकर, विकास बागडे आदी उपस्थित होते.
पोटोबाचे संचालन करण्यासाठी शहरातील दहाही झोनमधील महिला बचत गटांकडून २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले होते. समाजविकास विभागाकडे एकूण ३० अर्ज प्राप्त झाले. यातील २७ बचत गटांचे अध्यक्ष उपस्थित झाले होते. लहान मुलाच्या हाताने ईश्वरचिठ्ठी काढून सोडत देण्यात आली. ईश्वरचिठ्ठीमध्ये नाव आलेल्या नालंदा वस्ती स्तर संस्थेच्या बेबी रामटेके यांचे महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.