भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर घणाघात
नागपूर : एकीकडे एकापाठोपाठ एक गुन्ह्यांनी शहर हादरत आहे. राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितीन राऊत नागपूर शहरातील आहेत मात्र सुरक्षेसंदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही.
काही दिवसांपूर्वी महापालिकेत दोनदा नगरसेवक राहिलेले काँग्रेसचे देवा उसरे यांची भरदिवसा निर्घृण हत्या झाली. विशेष म्हणजे, देवा उसरे हे राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या मतदार संघातील रहिवासी होते. त्यांच्या हत्येचा तपास संथपणे सुरू आहे. मात्र चौकशी संदर्भात पालकमंत्र्यांकडून किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. याउलट पालकमंत्री नितीन राऊत उत्तरप्रदेशात दलितांवरील अत्याचाराविरोधात न्याय मागण्यासाठी गेले आहे. एकीकडे स्वतःच्या मतदार संघातील स्वतःच्याच पक्षाच्या दलित समाजातीलच माजी नगरसेवकाची क्रुरपणे हत्या केली जाते.
त्यावर कोणतीही भूमिका न घेता परराज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला जाणे ही दुटप्पी आणि संशयास्पद भूमिका आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी राज्याचे ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर केला आहे.