वर्धा – तंबाखू आणि तंबाखूजन्य विविध उत्पादनांच्या वापरामुळे भारतात कर्करोग आणि मुखकर्करोग पसरत असून आपल्या आयुष्यातून कर्करोगाचा धोका कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तंबाखू असलेली उत्पादने पूर्णपणे टाळा, असे आवाहन ज्येष्ठ मुख शल्यचिकित्सक डॉ. विनय हजारे, नागपूर यांनी शरद पवार दंत महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित ‘तंबाखूबाबत जागरूकता आणि मुखकर्करोग’ या विषयावर संवाद साधताना केले.
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठातील दंतविज्ञान शाखेच्या ओरल पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी विभागाद्वारे डॉ. विनय हजारे ‘ॲडजंक्ट फॅकल्टी ॲक्टिव्हिटीज’ उपक्रमांतर्गत जर्नल क्लब व रुग्णअभ्यास चर्चेसह अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली बोरले, उपअधिष्ठाता डॉ. अलका हांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. हजारे यांनी ‘अनुदान व अनुदान लेखन’ तसेच ‘प्रोलिफेरेटिव्ह व्हेरुकस ल्युकोप्लाकिया’ या विषयावरही मौलिक संवाद साधला. या उपक्रमात विविध विभागांचे प्रमुख, ओरल पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी विभागातील शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.