मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने जबरदस्त विजय मिळवत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमदेवार हे रिंगणात होते. ज्यापैकी महायुतीचे 9 उमेदवार हे निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला.
या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता समोर आला आहे. ज्यामध्ये भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी 26 मतं घेत अगदी सहज असा विजय मिळवला. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने शतप्रतिशत विजय मिळवला.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनीही पहिल्याच फेरीत दणदणीत विजय मिळवला. दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांकडे आवश्यक मतं नसताना देखील आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यात अजित पवारांना यश आलेआहे. पहिल्या फेरीतच शिवाजीराव गर्जे यांना 25 आणि राजेश विटेकर यांना 23 मतं मिळाली.
अशाच प्रकारे शिवसेना (शिंदे गट) यांनी देखील विजय मिळवला आहे. त्यांच्या दोन्ही उमेदवारांनी निश्चित कोटापेक्षा जास्तीची मतं मिळवली. कृपाल तुमाने यांना 25 मतं आणि भावना गवळी यांना 24 मते मिळाली.
या निवडणुकीत काँग्रेसकडे 37 मतं होती त्यामुळे त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होता. तर काँग्रेसच्या उरलेल्या मतांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला आहे. ठाकरेंकडे केवळ 16 मते होती. पण काँग्रेसच्या मतांच्या जोरावर त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी-
भाजपचे विजयी उमदेवार –
1.योगेश टिळेकर 2.पंकजा मुंडे 3.परिणय फुके 4.अमित गोरखे 5.सदाभाऊ खोत
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार –
6.भावना गवळी 7.कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार –
8.राजेश विटेकर 9.शिवाजीराव गर्जे
काँग्रेस विजयी उमेदवार –
10.प्रज्ञा सातव
शिवसेना ठाकरे गट-
11.मिलिंद नार्वेकर