नागपूर : राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत आरक्षणावर तोडगा काढला. परंतु या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असेल तर सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासून घेऊ, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलतांना केले. विरोधी पक्षाचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अधिसूचना जाहीर होऊ द्या, काही आक्षेप असेल तर त्यावर सुनावणी होईल. सरकारकडे नोंदी होत्या, मात्र प्रमाणपत्र मिळाले नाही, अशा ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असे बावनकुळे म्हणाले.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र उद्धव ठाकरे सरकारला ते टिकवता आले नाही. तेच आरक्षण परत देण्याची भूमिका सरकारची आहे.मुळात जे कुणबी समाजात होते, त्या लोकांना आता लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.
इतकेच नाही तर सरकारच्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी ती दूर करण्याचा प्रयत्न करू. या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासून घेऊ. यावर आक्षेपसुद्धा मागवले आहेत. त्याची सुनावणी होईल. त्यानंतर अधिसूचना मान्य होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.