मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी ‘सामना’साठी एक ‘मॅरेथॉन’ मुलाखत दिली आहे. ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीचे भाग शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आज त्याचाशेवटचा भाग सामनाच्या मुखपत्रात प्रकाशित करण्यात आला आहे. मुलाखतीच्या अंतिम भागात उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक घोषणा केली आहे. ‘‘मी अयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणार आहे. वाराणसीत जाऊन गंगा आरतीत सहभागी व्हायचे आहे!’’ देशाच्या राजकारणावर परिणाम घडवणारी ही घोषणा आहे. सरकारच्या सर्व योजना कागदावर आहेत आणि जाहिरातीवर चार हजार कोटी रुपये खर्च होतात ही जनतेच्या पैशाची लूट आहे, असेही ते कडाडले. पंतप्रधानांनी सर्व निवडणुका एकत्र घ्यायची घोषणा केली, पण निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करायला हव्यात, त्या कोणी करायच्या? असा सवाल त्यांनी केला. विधानसभेत २८८ जागा शिवसेना लढणार हाच स्वबळाचा अर्थ आहे, असा जबरदस्त भीमटोला त्यांनी मारला! मुलाखतीचे वादळ देशात घोंघावत आहे!
त्यांच्या मुलाखतीचा प्रकाशित झालेला अंतिम भाग…..
प्रश्न : उद्धवजी, तीन दिवसांपासून मुलाखत सुरू आहे. अनेक विषयांवर आपण चर्चा केलीत. चर्चा संपेल, पण देशापुढील समस्या संपत नाहीएत.
– कशा संपतील? त्याच्यावरती चर्चाच करत राहिले सगळे.
प्रश्न : लोकांचा राज्यकर्त्यांवरील विश्वास कमी झालाय?
– त्याला नक्की कोण जबाबदार आहे, याचा विचार मतदार म्हणून लोकांनी करायला नको काय?
प्रश्न : शिवसेनेकडून, खासकरून तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांचं राजकारण वेगळं होतं.
– नक्कीच आहे. याचं कारण शिवसेनाप्रमुखांचे राजकारण हे मी राजकारण मानतच नाही. राजकारण मी मानत नाही याचा अर्थ असा की त्यांची जी एक वृत्ती होती ती वृत्ती वेगळी होती. मला काय पाहिजे, हे आजच्या राजकारण्यांचे जे एक मुख्य कारण असतं राजकारणातलं ते कारण त्यांच्याकडे नव्हतं. आपल्याकडून जनतेला काहीतरी दिलं जावं, जनतेसाठी आपण काही करावं ही त्यांची सतत तळमळ आणि धडपड होती आणि त्याच्यापुढे त्यांनी सत्तेची कधी पर्वा केली नाही. सत्ता मला मिळालीच पाहिजे, नेहमी ते सांगायचे, पण स्वतः कधी सत्तेच्या खुर्चीवर बसले नाहीत.
प्रश्न : त्यांना सत्तेची हाव नव्हती?
– कधी मोहच नव्हता त्यांना… सत्तेच्या खुर्चीचा मोहच नव्हता आणि म्हणूनच ते दिशा देऊ शकले. त्यांचं राजकारण हे आत्मकेंद्रित नव्हतंच कधी. हे सर्वसामान्य माणसासाठी होतं…
प्रश्न : त्यांच्यासाठी शिवसेनाप्रमुख हे सर्वोच्च पद होतं.
– होय… त्यांनी कसली पर्वा नाही केली. परिणामाची पर्वा तर मुळीच केली नाही.
प्रश्न : तुमच्यासाठी कोणतं पद सर्वोच्च आहे?
– मला नेहमी असं वाटतं, की समजा मी राजकारणात नसतो, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख नसतो तरीसुद्धा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून मला जे प्रेम आज मिळालं आहे तेच तसंही मिळालं असतं. त्याच्यामुळे ते पद जरी नसलं तरी ते स्थान फार महत्त्वाचं आहे. अर्थातच माझ्या परीने मी प्रयत्न करतो…की जो एक आदर आणि प्रेम शिवसेनाप्रमुखांच्यामुळे त्यांचा मुलगा, पुत्र म्हणून मला मिळतंय, त्या विश्वासाला आणि प्रेमाला कधी तडा जाऊ न देणं याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो.
प्रश्न : उद्धवजी, तुम्ही नेहमी खरं बोलता, परखड बोलता, पर्वा करत नाही अनेकदा आणि ते तुम्ही राष्ट्रहितासाठी बोलता ही तुमची परंपरा आहे बाळासाहेबांपासून. मला सांगा, तुमचं बँकेत खातं आहे का?
– हल्ली खाती सगळी ती एका कार्डावरती आली आहेत. खातं तर आहेच. पण आणखीन डिटेल मागू नका…नाहीतर कुणीतरी हॅक करेल…
प्रश्न : नाही… तुमच्या बँकेत किती पैसे आहेत? तुम्हाला माहिती आहे का?
– राजकारण्यांची बँक ही मोठी व्होटबँक असते. त्याच्यामुळे मला माझ्या बँकेच्या खात्यापेक्षा सर्वसामान्य जनतेची जी खाती आहेत, त्या खात्यामध्ये मोदींनी वचन दिलेले १५ लाख खरंच येणार आहेत का? हा प्रश्न पडलाय.
प्रश्न : मला १५ लाख आलेत की नाही हीच माहिती घ्यायची आहे. कारण त्यानुसार या देशातल्या जनतेला कळायला पाहिजे की उद्धव ठाकरे यांना १५ लाख मिळालेत. आम्हालाही मिळू शकतात. ते १५ लाख आले आहेत का?
– मला नाही मिळाले तरी चालतील, मला नकोच… हेच तर मी सांगतो ना की शिवसेनाप्रमुखांचे राजकारण आणि हे आताचं राजकारण यात हाच मूलभूत फरक आहे की वेडीवाकडी स्वप्नं, वेडय़ावाकडय़ा थापा. यांना त्यांच्याकडे स्थान नव्हतं. मला नेहमी शिवसेनाप्रमुख सांगायचे की, तू जसा आहेस तसा जनतेसमोर जा… जनतेला एखादी गोष्ट आवडते, नावडते म्हणून मुखवटा घालून कधी जाऊ नकोस… जसा मी आहे तसा आहे… मला एकतर स्वीकारा किंवा नाकारा… लोकांना बरं वाटावं म्हणून किंवा मला सत्ता मिळावी म्हणून भूलथापा मारणं याला राजकारण नाही म्हणायचं.
प्रश्न : दोन कोटी बेरोजगारांना नोकऱया मिळाल्या आहेत, अशा प्रकारचं विधान मधल्या काळात मी वाचलं. आपल्या आसपासची बेरोजगारी कमी झाली आहे असं दिसतंय का आपल्याला? काही वर्षांपूर्वी जेव्हा आपण एक मोर्चा काढला होता तेव्हा २७ लाख बेरोजगार होते. आज ही संख्या डबल झाली आहे. मग या दोन कोटी बेरोजगारांना नोकऱया, रोजगार जो काही मिळाला आहे त्यातला महाराष्ट्राच्या वाटय़ाला किती रोजगार आला?
– हाच एक मोठा विषय माझ्या मते येत्या निवडणुकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या खात्यात १५ लाख तर काही आलेले नाहीत. योजनांचा सगळा जो काही डामडौल बघतोय आपण तो जाहिरातींच्या माध्यमातून. त्या जाहिरातींसाठी जवळपास चार-एक हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत. जनतेच्या खिशात तर पैसा आलेला नाहीये, पण हा जनतेच्या घामाचा पैसा सरकारच्या या जाहिरातींसाठी वापरला जातोय. याच्यावरती सरकारचा अधिकार तसा नाही. हा करदात्यांचा पैसा आहे. जो जनतेसाठी वापरला पाहिजे होता आणि योजना तुम्ही खरंच केल्या असतील, कितीतरी योजना आपण अशा दाखवू शकतो किंवा बघू शकतो की दरवर्षी वेगवेगळ्या नावाने घोषित केल्या जात आहेत.
प्रश्न : तुम्ही सामान्य जनतेचे नेते आहात. तुम्ही या राज्यातल्या किंवा देशातल्या शेतकऱयांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या मोठय़ा वर्गाचं नेतृत्व करताय. त्याच्यामुळे कदाचित ते अर्थशास्त्र तुमच्यापर्यंत आलं नाहीये. या देशाचा ‘जीडीपी’ वाढतोय हे तुम्ही विसरताय…
– मी सांगतो ना तुम्हाला… आता जीडीपी वाढतोय म्हणजे नेमकं काय वाढतंय. मी मागे असं गमतीत बोललो होतो… मी काही अर्थतज्ञ नाही… लोकं मला वेडा म्हणतील… पण जे नसलेले ज्ञान पाजळायची मला सवयही नाही आणि हौसही नाही. त्याच्यामुळे मला नखं वाढलेली कळतात. दाढी-मिशा वाढलेल्या कळतात…पण जीडीपी वाढतो म्हणजे कुठं नेमकं बघायचं ते कळत नाही…कुठे बघितला तर कळेल की जो जीडीपी वाढला आहे…
प्रश्न : पण तो वाढतो आहे… त्याचा प्रचार सुरू आहे…
– तेच नां… तेच माझं म्हणणं आहे… तो जर वाढत असेल तर मग तो कुठे वाढतोय नेमका? आणि जर वाढत असेल तर लोकांचं उत्पन्न का नाही वाढत आहे, लोकांचा पगार नाही वाढत आहे. शेतकऱयांना काल-परवाकडे दुधासाठी आंदोलन करावं लागलं… का करावं लागलं…
प्रश्न : इच्छामरण मागताहेत शेतकरी…
– इच्छामरण का मागताहेत?…खासकरून गुजरातचे शेतकरी. नोकऱयांसाठी बेकारांचे तांडे का फिरताहेत? मग तो ‘जीडीपी’ नेमका कुठे वाढतोय? वाढत असेल तर आनंद आहे… मी उगाच टीकेला टीका नाही करत. विकास दर जर वाढत असेल… तर विकास दर म्हणजे इतर गोष्टींचे दर वाढताहेत… पण विकास कुठे होतोय.. आणि कुणाचा होतोय.
प्रश्न : विकास गांडो थयो छे…
– मराठीमध्ये बोललात तर बरं होईल.
प्रश्न : म्हणजे विकास काहीतरी वेडा झाला…विकास काहीतरी पळून गेला…
– नाही… अर्थाचा अनर्थ नको व्हायला.
प्रश्न : हा जो ‘जीडीपी’ की काय वाढतोय, हा इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढलाय की आपण जगातली पाचवी अर्थव्यवस्था बनलो वर्षभरामध्ये. ही मोठी अचिव्हमेंट नाही का?
– आहे ना…!
प्रश्न : आणि तेसुद्धा आपण फ्रान्सला मागे टाकून…
– नाही नाही…हे टाळ्या घेणारं वाक्य आहे. पण टाळ्या वाजवून झाल्यानंतर पुन्हा ज्या हाताने टाळ्या वाजवल्या तेच हात रोजगार मागण्यासाठी पुढे करावे लागताहेत, हे भान नाही राहात त्या टाळ्या वाजताना… हे खरं माझं शल्य आहे. लोकांनी टाळ्या वाजवाव्या म्हणून काहीही सांगायचं, टाळ्या वाजवून घ्यायच्या, आपलं काम साधल्यानंतर लोकं तेच हात पुन्हा स्वतःच्या कपाळावर मारत जातात. मग कुठे काय वाढलं?
प्रश्न : टाळ्या तुमच्या सभांनाही प्रचंड मिळतात.
– नक्कीच! पण मी हे असं काही सांगत नाही. विकास दर वगैरे एक तर मलाच कळत नाही. मी तर नेहमी कामगार, शेतकरी यांची बाजू मांडतो. आमची जशी भारतीय कामगार सेना आहे, बेरोजगारांसाठी लोकाधिकार समिती आहे, शेतकऱयांसाठी तर शिवसेना आता स्वतःच उतरली आहे रस्त्यावरती. त्यांचे न्याय्य हक्क आणि त्यांच्या लढाईमध्ये मला हा वाढलेला विकास दर कुठेच दिसत नाही. असेल तर चांगला आहे, माझं म्हणणं. मी काही उगीच टीकाकार म्हणून टीका करण्याची भूमिका नाही करत. जे खरं आहे ते खरं मला दाखवा. पण जाहिरातीमध्ये अमूक इतक्या लोकांना रोजगार मिळाला असे सांगतात तेव्हा धक्का बसतो. मी सतत लोकांना भेटतो. राज्यात फिरतो. प्रत्येक सभेत मी विचारतो, की शेतकरी आलेत ना रे. बहुतेक सगळे शेतकरी असतात. किती जणांचं कर्ज माफ झालंय?
प्रश्न : मग लोक काय म्हणतात?
– आतापर्यंत मला नाही वाटत सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी फिरतो तेव्हा दोन-पाचाच्या वरती हात वर झाले असतील. मग असं काही आहे का की यांचं कर्ज माफ झालंय तर ते माझ्या सभेला येतच नाहीत. की माझ्या सभेला जे येतात ते शेतकरी नाहीत, की त्यांच्याकडे पण शेतकऱयांच्या बोगस डिग्र्या आहेत. मग ते जातात कुठे? महिलांसाठी योजना… मी महिलांना विचारतो, की का हो, तुमच्या गावात असं झालंय का? नाही म्हणतात त्या. पण पंतप्रधानांच्या फोटोनिशी जाहिरात जेव्हा येते किंवा होर्डिंग लागतं तेव्हा लोकांना वाटतं माझ्या गावात नसेल, पण दुसरीकडे कुठेतरी झालं असेल. दुसरीकडे वाटतं माझ्या गावात नाही, तिसरीकडे झालं असेल. आणि एकूणच राज्याला असं वाटत असेल, माझ्या राज्यात नाही, पण दुसऱया राज्यात झालं असेल. खरं काय हे कधी कळणार?
प्रश्न : म्हणजे लोकशाहीची ‘अफवा’शाही झाली आहे का?
– मला आता हेच सांगायचं आहे, की मी तो एक कार्यक्रमच आता शिवसैनिकांना दिलेला आहे. सत्यशोधन! खरं काय ते कळलं पाहिजे. सत्तेत असल्यामुळे आमचीसुद्धा ती जबाबदारी आहे की, खरंच सरकारी योजना घोषित केल्यानंतर जनतेपर्यंत त्या पोहचत आहेत की नाहीत. घोषणा नाही योजना. त्या योजना पोहचल्यानंतर त्याचा लाभ जनतेला मिळतो आहे की नाही, हे पाहणं आमचं काम आहे. शेतकऱयांची कर्जमुक्ती ही घोषणा झाल्यानंतर खरंच किती शेतकऱयांना…पात्र-अपात्र…दोन्ही शेतकऱयांविषयी बोलतोय मी. पात्र ठरलेल्या शेतकऱयांना काही काही ठिकाणी आम्ही बघतो ना, दोन-पाच रुपयांचे चेक मिळतात. मग या योजना खरंच किती झाल्यात, महिलांसाठी योजना, किती झालेल्या आहेत? सौभाग्य योजना, खरंच किती कृषी वीजपंपांना मोफत वीज जोडणी, मोफत वीज नाही… मिळालेली आहे? वगैरे वगैरे अशा योजना, गॅस सिलिंडर आणखीन या सगळ्या गोष्टी या ज्या वेळेला लोकं स्वतःचे अनुभव बोलायला लागतील, कारण ते आता बोललं पाहिजे. लोकांनासुद्धा, सामान्य जनतेलासुद्धा मन आहे आणि ते मनसुद्धा बोलतं. ते मन आता बोललं पाहिजे.
प्रश्न : मुख्यमंत्र्यांशी किती संवाद आहे आपला?
– मुख्यमंत्र्यांशी माझं वाईट काहीच नाहीये. चांगला संवाद आहे माझा. तसा तो आधीच्या मुख्यमंत्र्यांशीही होता. राजकारण म्हणजे फक्त खेचाखेची किंवा सूड हे मानायला मी तयार नाही.
प्रश्न : मुख्यमंत्री आपल्याकडे अमित शहांबरोबर संवाद आणि समर्थनासाठी आलेच होते…
– मी कुठे काय म्हटलं. कुणाला काही शंका आहे काय?
प्रश्न : अमित शहा ‘मातोश्री’वर आले हा चमत्कार कसा काय झाला?
– चमत्कार म्हणजे असं आहे की, ‘मातोश्री’ शेवटी शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान आहे. मी त्यांचा पुत्र म्हणून माझंही तेच घर आहे हे माझं भाग्य आहे. आणि साहजिकच आहे, आता पक्षाची जबाबदारी, धुरा मी पूर्णपणे पाहात असल्यामुळे त्यांचं ते संपर्क अभियान, या अभियानासाठी आले होते. माझ्याकडे आले. बाबासाहेब पुरंदरेंकडे गेले.
प्रश्न : पण संपर्क प्रस्थापित झाला का, खऱया अर्थाने.
– नाही. सगळ्यांशी संपर्क करताहेत न ते आता…
प्रश्न : माधुरी दीक्षितनाही भेटले.
– त्यांनाही भेटले, बाबासाहेबांनाही भेटले.
प्रश्न : संजय दत्तलाही भेटले.
– लतादीदींची तब्येत बरी नव्हती. त्यांना भेटता आलं नाही, ते कालच्या भेटीत दीदींना भेटल्याचं मी पाहिलं. पण ते संपर्क अभियान आहे. आता मग आमची चर्चा काय झाली, त्याच्यापेक्षा या सर्व लोकांशी काय चर्चा झाली ते पण इंटरेस्टिंग आहे.
प्रश्न : तुम्ही सध्या शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीकडे फार लक्ष देताय? काय चित्र आहे संघटनेचं?
– शिवसैनिक जोशात आहेत. अनेक विभागांत युतीमध्ये काही मतदारसंघ शिवसेनेकडे नव्हते. तिकडे आता पक्षबांधणी चांगली चालली आहे. कारण आतापर्यंत जसं मी मघाशी उदाहरण देताना तुम्ही जो प्रश्न विचारला पालघर…त्या पालघरमध्ये कधी तो लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने लढलाच नव्हता. पण आता तिकडे गावागावात आणि खेडय़ापाडय़ात आणि वस्त्यांमध्ये शिवसैनिक निर्माण झाले आहेत. तसा शिवसैनिक आता राज्यभर झालाय. आणि पक्ष वाढवणे हे माझं काम आहे. ते जर मी करणार नसेन तर पक्षप्रमुख या पदावर बसण्याची माझी योग्यता नाहीये. त्याच्यामुळे पक्ष वाढवणं आणि तळागाळापर्यंत हा जो शब्द आहे तिथपर्यंत माझा पक्ष पोहचवणं हे माझं काम आहे आणि ते मी करतोय.
प्रश्न : म्हणजे आपण जे विधान केलं होतं २०१६ साली आणि वारंवार आपण त्याचा पुनरुच्चार केलेला आहे की, युतीची २५ वर्षे सडली. ही दुरुस्ती आपण करताय का?
– जर मला तसं वाटलं असेल आणि ती मी दुरुस्ती करणार नसेन तर मग माझा पक्षाला उपयोग काय? जसं तुम्ही आता म्हणालात की जनतेच्या शिवसेनेकडून अपेक्षा आहेत. तशा माझ्याही जनतेकडून आणि शिवसैनिकांकडून अपेक्षा आहेत. त्याही मी माझ्याकडून, त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतोय. जर एखाद्या विभागामध्ये शिवसेना आतापर्यंत पोहचली नसेल किंवा काम थोडं कमी असेल, केवळ आणि केवळ तो मतदारसंघ आपल्याकडे नव्हता म्हणून तर तिकडे जनतेची मागणी असेल तर शिवसेना मला पोहचवली पाहिजे.
प्रश्न : जिथे तुम्ही पोहचला नव्हतात २५ वर्षे तिथे आता संघटना बांधणीचे काम सुरू आहे.
– फक्त बांधणीचं नाही, बांधणी ही चालूच आहे.
प्रश्न : त्या प्रत्येक मतदारसंघात शिवसेना लढणार आहे का?
– स्वबळाचा अर्थ काय?
प्रश्न : तेच विचारतोय मी. प्रत्येक मतदारसंघात शिवसेना लढणार आहे का? २८८ जागा आहेत.
– नक्कीच लढणार. आणि मी मध्ये पण म्हटलं की, स्वबळाची घोषणा किंवा युतीची घोषणा ही एकटय़ाची नसते. याचा अर्थ माझ्या राष्ट्रीय कार्यकारिणीने तो घेतलेला निर्णय आहे, शिवसेनेच्या. सगळ्यांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे.
प्रश्न : सातत्याने एक धमकी दिली जातेय लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेऊ. ही तुम्हाला धमकी वाटते काय?
– नाही… मी संधी मानतोय. माझी तीच अपेक्षा आहे की दोन्ही निवडणुका एकत्रच व्हाव्यात. धमक्या कसल्या? मी धमक्यांना भीक घालत नाही.
प्रश्न : ‘वन नेशन वन इलेक्शन’ हा एक नारा दिला जातोय. पण हिंदुस्थानच्या लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या सर्व निवडणुका एकत्र घेणं योग्य आहे?
– त्याच्याकडे मी वेगळ्या दृष्टीने बघतो. ‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजे सगळ्या निवडणुका एकदम. आपल्याकडे म्हटलं जातं ना तुम्ही सगळ्यांना एकदा मूर्ख बनवू शकता, एकाला सर्वकाळ मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. तर मग ज्यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आहे त्या सर्वांना एकदा मूर्ख बनविण्याची संधी म्हणून ते ‘वन नेशन’वाले इलेक्शन बघताहेत का? की एकदाच प्रत्येक वेळाला कारण किती वेळा जाऊन फसवत बसवायचे. सगळ्यांना एकदा बनवू शकाल. सगळ्यांना परत परत मूर्ख नाही बनवता येत.
प्रश्न : प्रधानमंत्र्यांनी ही घोषणा केल्यापासून ‘वन नेशन वन इलेक्शन’ या घोषणेला पाठिंबा देण्याची लाट आली आहे.
– कल्पना चांगली आहे. ठीक आहे, पण सर्वांना एकदा मूर्ख बनवता येतं आणि ती संधी म्हणून कोण याकडे बघत असेल तर ते चूक आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की, पंतप्रधानांच्या डोक्यात ही कल्पना आली असेल तर मुळामध्ये मी मधे जे माझं मत मांडलं होतं की, शिवसेनाप्रमुखांनी ही गोष्ट पूर्वी सांगितली होती आणि ती अंमलात आणली पाहिजे, तरच तुमच्या निवडणुका ‘फेअर’ होतील.
प्रश्न : शिवसेनाप्रमुखांची काय मागणी होती?
– पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री हे प्रचारापासून दूर राहिले पाहिजेत, राहिलेच पाहिजेत दूर. कारण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून, मंत्री म्हणून तुम्ही शपथ घेता ते सर्वांशी समानतेने वागण्याची शपथ घेता. तुम्ही देशाचे पंतप्रधान असता, पक्षाचे पंतप्रधान नसता. तुम्ही जाऊन एखाद्या पक्षाचा जर प्रचार करणार असाल तर तो अपराध आहे, लोकशाहीमध्ये. जर तुम्ही कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाणार असाल तर अपक्षाने जर बोलवलं तर त्याच्याही प्रचाराला तुम्हाला जावं लागेल. मग तुम्ही म्हणाल, तो अपक्ष माझा समर्थक आहे, मी जातो, असे नाही. कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला तुम्ही जायला पाहिजे. आणि ते जर जाणार नसाल तर निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि बाकीच्यांनी पडता कामा नये. एक सोपा विषय आहे. या निवडणुकीच्या प्रचारात, निवडणुकीच्या कामामध्ये सरकारी कर्मचारी असतात, पण निवडणुकीच्या प्रचारात साधा सरकारी कर्मचारी सापडला तर त्याच्याबद्दल काय कारवाई केली जाते. त्याला नोकरीतून काढलं जातं. मग त्या सरकारचा जो प्रमुख असतो तो प्रचाराला कसा जाऊ शकतो? आणि तो प्रमुख येऊन जर का एखादं भाषण करणार, मोठमोठय़ा घोषणा करणार, अमिषे दाखवणार हे कसे बरोबर आहे? ते मध्ये बिहारमध्ये झालं होतं ना, कितने करोड दे दूं! आता हे तुम्ही सामान्य माणूस म्हणून बोलण्याची हिंमत कराल?
प्रश्न : ते प्रधानमंत्री म्हणून करतात. त्यांच्या हातात देशाची तिजोरी आहे.
– मग तेच माझं म्हणणं आहे. तुम्ही जे बोलताय ते केलेत का, दिलेत का? पानंच पुसली ना?
प्रश्न : कल्याण-डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या, नाशिकला केल्या.
– केल्या, पण दिले का? दिले का पैसे त्यांनी? बिहारला मिळाले? कल्याण-डोंबिवलीला मिळाले? पण घोषणा केल्यानंतर लोकांचा विश्वास बसला.
आणि त्यावेळेला तुम्ही शिवसेना नेता म्हणून संजय राऊत तिथे गेले आणि एका बाजूला पंतप्रधान बोलताहेत की सवा लाख कोटी देईन. संजय राऊत यांची हिंमत आहे का सवा लाख कोटी रुपये देईन असे सांगण्याची?
प्रश्न : लोक विश्वासही ठेवणार नाहीत.
– लोकं म्हणतील अरे, पंतप्रधान आहे हा माणूस. त्याचं आपण ऐकलं पाहिजे. ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? आणि शिवसेनाप्रमुख बोलायचे ना, सडकून टीका करायचे ते याच लोकशाहीवरती करायचे. ही लोकशाही होऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याला जसं निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांना जाहिरातीवरती बंधन असतात. पण पूर्ण पाच वर्षे जनतेचा पैसा वापरून तुम्ही तुमची जाहिरात करता. तुमचं कर्तृत्व नाही, तो जनतेच्या करातून गोळा झालेला पैसा आहे ते तुम्ही जनतेला देताय. तुमचं काय कर्तृत्व आहे त्याच्यात.
प्रश्न : २०१९ चे घोडामैदान लांब नाही.
– घोडा आणि मैदान कोणाचं आहे ते लवकरच कळेल. आकडय़ांचाच खेळ असतो शेवटी. या वेळी अविश्वास ठराव मंजूर झाला नाही.
प्रश्न : हे आकडे २०१४ चे आहेत.
– बरोबर आहे, पण आता निदान सरकार जेथे चुकतेय त्यावर सगळे मिळून बोलायला लागलेत. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे आवश्यक असते. एखादा कोणी सरकारविरुद्ध बोलला तर राज्यकर्त्यांनी त्याला एकदम देशद्रोही ठरवू नये. तो आपल्याविरोधात का जातोय? खासकरून आपलाच मित्र आपल्याविरुद्ध का बोलतोय हेच समजून घेण्याची वृत्ती नसेल तर मग तुमचा तो पारदर्शक कारभार कसा होणार?
प्रश्न : ज्या प्रकारचे निकाल पोटनिवडणुकांमध्ये लागले अनेक राज्यांमध्ये, ते पाहता भारतीय जनता पक्ष स्वबळावर केंद्रामध्ये २०१९ मध्ये सत्तेवर येईल असे चित्र अजिबात आज दिसत नाही. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन वर्षांपूर्वी स्वबळावर ३५० जागा जिंकण्याची भाषा सातत्याने केली. पण आज मात्र ते एनडीए मजबूत करण्याच्या मागे लागलेले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी. हा तुम्हाला फरक दिसतोय का?
– जो प्रश्न तुम्ही, म्हणजे प्रसारमाध्यमं, पत्रकार मला शिवसेनेने स्वबळाची घोषणा केल्यानंतर सातत्याने विचारत आहेत की, खरंच तुम्ही लढणार का स्वबळावर? मग त्यांना का नाही हा प्रश्न विचारत?
प्रश्न : माझा तोच प्रश्न आहे की, त्यांनी अचानक ही भूमिका का बदलली?
– ३५० जागा… आकडा चांगला काढलाय. मग कशाला त्यांना युतीची गरज आहे? आणि ते जर ३५० जागांची तयारी करत असतील तर मी माझी तयारी केली तर कुठे गुन्हेगार ठरतो. मी देशभर लढतोय का? देशातल्या इतर राज्यांनी जर का ठरवलं शिवसेना पाहिजे आणि तशी आता लढायला सुरुवात केलेली आहे, तर देशभर पण लढेन. निदान मी माझ्या घरात, माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या स्वबळाची भाषा नाही केली तर मी कुठे करणार? आणि मग मी अपराधी कसा? मी गुन्हेगार कसा? आणि शिवसेनाप्रमुख होते त्याही वेळी प्रमोद महाजनांनी शत-प्रतिशतचा नारा दिलाच होता. ते का विसरतात सगळे?
प्रश्न : उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्रसुद्धा आपण गृहीत धरा. या मोठय़ा राज्यांतून भाजपला फटका बसण्याची शक्यता दिसतेय.
– मी काही ज्योतिषी नाही. पण हवा बदलतेय खरी.
प्रश्न : हे आपण म्हणत नाही, ज्यांनी भाजपला २०१४ ला डोक्यावर घेतले तेच म्हणताहेत. मग प्रसिद्धीमाध्यमं असतील, त्यांचे समर्थक असतील. अशा वेळेला २०१९ ला जर विचित्र परिस्थिती निर्माण झाली राजकारणामध्ये, त्यात शिवसेना नक्की कुठे असेल?
– शिवसेना नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. उद्याचे चित्र काय असेल तो कोरा कागद नुसता डोळ्यासमोर ठेवून नाही चालणार. त्याच्यासाठी अजून काही दिवस जाण्याची गरज आहे. आता जे मी सांगत होतो तुम्हाला की, पहिल्याप्रथम इतक्या वर्षांनंतर विरोधी पक्षांमध्ये जराशी हालचाल दिसायला लागली आहे. सरकारच्या विरुद्ध सगळं बळ एकवटून ते बोलायला लागलेले आहेत. आणि शेवटी हे बळ जे आहे हे कितपत आणखी वाढतंय.. जनतेपर्यंत किंबहुना सर्वोच्च जनता आहे. त्याही वेळेला आता जसं आणीबाणीची आठवण झाली. कशासाठी काढली गेली मला माहीत नाही. ४०-४३ वर्षे, काय सुवर्ण महोत्सव आणीबाणीचा, हीरक महोत्सव आणीबाणीचा. एकतर तशी ती गोष्ट नव्हतीच. पण अशी मुद्दामहून आठवण काढण्याची ती गोष्ट नव्हती. तरीदेखील जागवल्या गेल्या त्या आठवणी.
प्रश्न : पंतप्रधान आणीबाणीवर बोलतात, राममंदिरावर बोलत नाहीत.
– सांगतो ना… आणीबाणीच्या आठवणी जागवल्या गेल्या. त्या वेळेला इंदिराजींबद्दल कोणी काही म्हणो, पण त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्याच्यानंतर इतरही काही गोष्टी केल्या त्या आता सगळ्या काही उगाळत बसत नाही, त्याचा प्रचार करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. थोडक्यामध्ये काय, की एका महिलेने देशात कसा धाक निर्माण केला होता त्याच्या आठवणी जागवल्या गेल्या. त्याला आता ४०-४३ वर्षे उलटून गेली. त्या एका महिलेने स्वतःचा धाक निर्माण केलेल्या देशामध्ये आज महिला असुरक्षित आहेत आणि महिलांच्या असुरक्षिततेच्या बाबतीत जगामध्ये आपला पहिला क्रमांक लागतो हे आणीबाणीच्या आठवणी जागविण्यापेक्षा जास्त लाजिरवाणं आहे.
प्रश्न : काय म्हणायचे आहे तुम्हाला?
– एक महिला तेव्हा जर धाक निर्माण करू शकत होती त्याच देशात एकही महिला सुरक्षित का नाही? मग आपण त्या आठवणी जागवून उपयोग काय आहे? महिलांना तुम्ही सुरक्षित केलेत का? महिलांना सुरक्षितता वाटते का? बरं, हा देशाबद्दलचा खोटा प्रचार असेल तर खोडलात का तुम्ही? जर हा अपप्रचार असेल तर हे गंभीर आहे. अपप्रचार आहे म्हटल्यानंतर तो खोडला गेला पाहिजे, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. सरकारचे जे मंत्री आहेत ते देशाबद्दल बोलण्यापेक्षा पक्षावर जर कोण बोललं तर उत्तरं देतात. पण हे मी म्हणेन, माझ्या मातृभूमीची जर कोण विटंबना करत असेल तर नुसत्या ‘वंदे मातरम्’चा काय उपयोग आहे! ज्या देशात माता आणि भगिनी सुरक्षित नसतील आणि आम्ही आपले ‘वंदे मातरम्… इस देश मे रहेना होगा… वंदे मातरम् कहना होगा…’ अरे, बोलतो, पण ती माता तुझी सुरक्षित आहे का? काय त्या वंदे मातरम्चा उपयोग?
प्रश्न : राहुल गांधीविषयी आपले काय मत आहे?
– शेवटी माझ्या मताची गरज काय? जनतेनेच ठरवायचं मत काय.
प्रश्न : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. एका वर्गाचं नेतृत्व करताहेत. त्यांना पप्पू म्हणून हिणवलं जातंय. ते पपू आहेत का?
– आता मराठीमध्ये पपू म्हणजे परमपूज्य पण होतं. मग तसे त्यांना ते पपू बोलतात का? माहीत नाही मला.
प्रश्न : विरोधकांची महाआघाडी बनविण्याचे काम सुरू आहे.
– मघाशी एक राममंदिराचा तुमचा विषय सुटला.
प्रश्न : तो येतोय… विरोधकांची महाआघाडी बनविण्याचे काम सुरू आहे. हे कितपत गांभीर्याने घेता येईल असं वाटतं?
– पण मोदींचे गुरुजी म्हणालेत महाराष्ट्रात ते शक्य नाही.
प्रश्न : हो, पण शरद पवारसुद्धा एक त्या महाआघाडीचे नेते आहेत.
– पण तेच बोलले ना, की महाराष्ट्रात शक्य नाही.
प्रश्न : आपलं शरद पवारांविषयी…
– त्यांना हे असे बोलायची गरज होती का या वेळी? कुणासाठी ते बोलले? त्यांनी पहिल्याच ह्याच्यामध्ये ते काय… प्रथमग्रासे मक्षिकापात… त्यांची माशी शिंकलेली आहे.
प्रश्न : ममता बॅनर्जी आपल्या संपर्कात असतात?
– ममता दीदींचा कधीकधी फोन येतो… बोलणंही होतं.. मध्ये मुंबईत आल्या होत्या, त्या वेळेला मला म्हणाल्या, भेटू शकते का? मी म्हटलं भेटतो, गेलो होतो त्यांना भेटायला.
प्रश्न : मघाचा प्रश्न अर्धवट असा राहिला की, प्रधानमंत्री जे आपले आहेत ते आणीबाणीवर बोलतात, इतर अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर बोलतात. पण ज्या राममंदिराच्या आंदोलनातून भारतीय जनता पक्ष इथपर्यंत पोहोचलाय त्या राममंदिराचे भविष्य काय? राम वनवासातून कधी मुक्त होईल? त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचा एकही नेता बोलायला तयार नाही. आणि २५ वर्षांनंतरसुद्धा आज एक मजबूत सरकार येऊनसुद्धा रामाचा वनवास संपला नाही, याच्याविषयी काय म्हणाल?
– याचा अर्थ निवडणुकीला अजून थोडा अवधी आहे.
प्रश्न : अवधी आहे…
– थोडासा अवधी आहे.
प्रश्न : म्हणजे परत एकदा रामाचं कार्ड चालवलं जाईल…
– हो, दुसरं काय? मधे ते विधान केलंच होतं, पण त्याच्यानंतर ते मागे घेतलं. आम्ही असं बोललो नाही असा त्यांच्याकडून खुलासा आला भाजपाकडून, की निवडणुकीच्या पूर्वी राममंदिराच्या कामाला सुरुवात होईल. म्हणजे ते पुन्हा एकदा निवडणूक त्याच्यावरती घेऊन जाऊ शकतात. पण एक आहे, ते काम कधी सुरू होईल, कधी काय होईल मला माहिती नाही. पण माझी स्वतःची इच्छा आहे, मी अयोध्येला जाऊन येणार आहे.
प्रश्न : उत्तर हिंदुस्थानमधल्या लाखो लोकांची अशी इच्छा आहे की, ज्या राममंदिरासाठी शिवसेनेनं बलिदान दिलेलं आहे, शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे तिथे बाळासाहेबांनी यावं अशी इच्छा होती. पण उद्धव ठाकरे यांनी तरी यावं एकदा आणि रामाचं दर्शन घ्यावं…
– मी म्हटलं ना, माझी स्वतःची इच्छा आहे आणि लवकरात लवकर तिथे जाण्याचा माझा मनोदय आहे.
प्रश्न : आपण अयोध्येत जाणार?
– जरुर जाणार. रामजन्मभूमीच्या इथे जाऊन रामलल्लांचे दर्शन घ्यायचे आहे. तोपर्यंत राममंदिर होणे शक्य नाही. कारण मला लवकरात लवकर जायचे आहे. माझी अयोध्येत जाण्याची इच्छा आहे आणि मी जाणार.
प्रश्न : त्याचप्रमाणे आपल्याला वाराणसीमधूनही आमंत्रण आहे की, आपण एकदा गंगाकिनारी जाऊन गंगाआरती करावी आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं…
– गंगा किती साफ झाली आहे ते पण मला बघायचे आहे.
प्रश्न : या दोन्ही ठिकाणी जर आपण गेलात तर उत्तर हिंदुस्थानमध्ये शिवसेनेचं नक्कीच एक नवीन वातावरण निर्माण होऊ शकतं.
– तिथल्या शिवसैनिकांसाठी आणि हिंदूंसाठी तर नक्कीच जाईन. पण मलाही स्वतःला जायचे आहे. अयोध्येला पण जाणार आणि वाराणसीलाही जाईन. कार्यक्रम लवकरच जाहीर करीन.
प्रश्न : म्हणजेच आपण देशाचे राजकारण गांभीर्याने करू इच्छिताय…
– रामाचं दर्शन घेणं म्हणजे राजकारण हा एक समजच चुकीचा झालेला आहे.
प्रश्न : कश्मीरचा विषय गंभीर आहे…
– कुठे आहे गंभीर? आबादी आबाद आहे.
प्रश्न : गेल्या साधारण रमझानच्या निमित्तानं जी युद्धबंदी झाली, शस्त्र्ासंधी झाली त्या दरम्यानच आपले सर्वाधिक सैनिक मारले गेले, चारशेच्या वर. आणि आता पीडीपीच्या सरकारमधून बाहेर पडून बीजेपी हे सगळं खापर मेहबुबा मुफ्तीवरती फोडतंय…
– म्हणूनच तर म्हटलं, आबादी आबाद आहे सगळं.
प्रश्न : कश्मीर हिंदुस्थानात आहे की नाही, हा प्रश्न आता पडायला लागला आहे…
– आपण कोणताच विषय तसा कधी गांभीर्याने घेत नाही. एखादी बातमी आली का चुकचुक करतो. एवढे सैनिक मारले गेले, इकडे हल्ला झाला, तिकडे हल्ला झाला आणि मग सोडून देतो. कश्मीरच्या प्रश्नाचेसुद्धा. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. आपण आधी जे जाहीर केलं होतं निवडणूक लढताना की एकतर पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जाईल. म्हणजे कसं मला माहीत नाही, पण अद्याप पाकिस्तानच्या भूमीवर तरी आपण त्यांच्या आत घुसलोय… ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाला तो पाकव्याप्त हिंदुस्थानमध्ये झाला, कश्मीरमध्ये झालेला आहे. तो पाकिस्तानमध्ये नाही केला आपण. तेसुद्धा गरजेचं होतं. तेसुद्धा कमी शौर्याचं नाहीये, नक्कीच नाहीये. परंतु या सगळ्या गोष्टी किंबहुना एकप्रकारचं युद्धच आहे… आणि जे चाललंय ते आपल्या हिंदुस्थानच्या भूमीवर. कश्मीरमध्ये दहशतवादी घुसताहेत, गोळीबार होतोय, बॉम्बस्फोट किंवा हँडग्रेनेडस् फेकले जातायेत…काय होतंय… हे सगळं आपल्या देशात चाललंय. जशास तसं उत्तर म्हणजे त्यांच्या देशात घुसून उत्तर दिलंय का आपण आतापर्यंत? देण्याची ताकद, कुवत आणि हिंमत आहे का आपल्यामध्ये? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपण त्या दिशेने जायला लागलो का मग पुन्हा तो विषय कुठेतरी राममंदिरकडे येतो. राममंदिराच्या दिशेने जास्त गळ्यात येतंय म्हटलं की, कश्मीरकडे जातो. मग असं करत करत या गल्लीतून त्या गल्लीकडे फिरत फिरत चाललंय.
प्रश्न : हे सगळे प्रश्न संपावेत कायमचे म्हणून आपण सर्वांनी मोदींना सत्तेवर आणलं?
– हो, पण अजून विषय तसेच आहेत.
प्रश्न : मग हे विषय संपणार कधी?
– आजसुद्धा मला ज्या त्यांच्या गोष्टी पटत नाहीत त्या मी उघड बोलतोय. आजसुद्धा माझी इच्छा आहे की, खरंच मोदींनी पाकिस्तानचा निकाल लावावा. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. नाहीतर सैनिक आपले जाताहेत… शहीद होतायेत आणि ते आपल्या भूमीवरती होतायेत. मग तो काय तो तुम्ही एक घाव दोन तुकडे करा ना… जसं इंदिरा गांधींवर टीका करताना आपण म्हणतो ना, इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केलेच होते, केलेच…
प्रश्न : जनता एक स्वप्न पाहात आहे, की या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं स्वबळावरचं राज्य यावं आणि त्या संपूर्ण बहुमताचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावं… हे स्वप्न कसं पूर्ण होईल? कधी पूर्ण होईल?
– स्वप्न कोण बघतंय?
प्रश्न : जनता पाहतेय…
– जनतेचं स्वप्न जेव्हा जनता ठरवेल की आता मी पूर्ण करणार त्या वेळी ते होणार. जनता एखादी गोष्ट ठरवते तिच्याआड कोणीही येऊ शकत नाही. मी धडपड करतोय तेवढय़ाचसाठी करतोय… मी माझ्यासाठी काही करत नाही, मला काही व्हायचंय म्हणून मी काही करत नाहीये. पण हे एक क्रत म्हणून मी पुढे नेतोय. शिवसेनाप्रमुखांनी सत्तेचं जे स्वप्न स्वतःसाठी नाही पाहिलं. भगवा फडकवणार… कशासाठी भगवा फडकवणार… तर राज्याचं हित हे साधण्यासाठी मला भगवा फडकवायचाय. जनतेचा जर विश्वास असेल आणि जनतेचा जर निश्चय असेल तर मला वाटतं तो दिवस लांब नाही.
प्रश्न : उद्धवजी, आपण अनेक विषयांवर चर्चा केली. जनतेच्या मनातल्या अनेक प्रश्नांना आपण ठाकरे शैलीमध्ये आणि ठाकरे नीतीने उत्तरे दिलीत. जनतेच्या आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की, त्या अपेक्षा पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला आई जगदंबा देवो…
– मी जनतेकडे हेच मागणं करेन की, केवळ आणि केवळ आपला विश्वास आणि आपलं प्रेम हेच म्हटलं तर माझं भांडवल आणि माझं सगळं काही आहे. त्याच्यात कमी पडू देऊ नका. मी माझ्याकडनं आपल्या सेवेत कधीही कमी किंवा कमतरता पडू देणार नाही.