मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन : गणेशोत्सव मंडळांसोबत चर्चा
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोव्हिडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे शक्य नाही. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनीही या संकटाच्या प्रसंगी एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येउ नये यासाठी आपण सर्वांनी यंदाचा गणेशोत्सव घरीच साजरा करूया, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
आरोग्याची काळजी घेउन गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे नागपूर शहरात पालन व्हावे यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील काही गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, राजू भिवगडे, हरीश राउत, अशोक पाटील, गणेश राठोड, विजय हुमने, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, साहस गणेशोत्सव मंडळ प्रतापनगरचे गोपाल बोहरे, श्री बालमित्र गणेशोत्सव मंडळ छापरूनगरचे आकाश राजनानी, श्री तरूण बालमित्र गणेशोत्सव मंडळ मच्छीसाथचे विनोद लारोकर, दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळ महाल चे अक्षय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
येत्या २२ ऑगस्टला गणेश चतुर्थी असून त्यादिवसापासून दीड ते दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र हा उत्सव साजरा करताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंग कटाक्षाने पाळले जाईल यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार घरगुती गणपती मूर्तीची ऊंची दोन फुटांपर्यंत आणि सार्वजनिक गणपतीची ऊंची चार फुटांपर्यंतच असयाला हवी. या गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मुर्तीचेच पूजन करावे. हे शक्य नसेल आणि मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असेल तर तिचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावी. घरी विसर्जन अशक्य असेल तर कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात यावे. विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीत-कमी वेळात घरी पोहचावे. शासनाच्या या निर्देशांचे पालन होईल याची सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.
गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना त्या ठिकाणी गर्दी होउ नये याची काळजी घ्यावी. सदर ठिकाणी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करता रक्तदान शिबिर, कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांसाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करावी. गणपती मंडपाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष दर्शन घ्यायला येणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे, स्वच्छतेचे नियम पाळण्याची अट घालावी. शासनाच्या या नियमांची जनजागृती करून सर्व गणेश मंडळांनी जबाबदारीने स्वत:सह इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आवाहन केले.