नागपूर : सैन्य दलात लेफटनंट पदावर क्षितीज लिमसे या 22 वर्षीय तरुणाची निवड झाली आहे. जिल्हयात कार्यरत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिपक लिमसे यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या क्षितीज चे हे यश विदर्भातील तरुणासाठी प्रेरणादायी असेच आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज क्षितीज लिमसे यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी क्षितीजने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
मराठी तरुणांचा सैन्यदलात जाण्याकडे फारसा कल नसतो. मात्र क्षितीजने इयत्ता आठवीपासुनच सैन्य दलात जाण्याचे ध्येय ठेवले होते. वडील सैन्यदलाच्या सेवेत असल्याने या सेवेविषयी घरात अनुकुल वातावरण होते. सैन्यदलाच्या शौर्यगाथा पाहून या सेवेविषयी कुतुहल व सुप्त आकर्षण त्याला होते. इयत्ता 8 वी ते 10 वी सोमलवार हायस्कूल मधून शिकलेल्या क्षितीज ने दहावीनंतर औरगाबाद येथील एसपीआय (सर्व्हीस प्रिपरेटरी इन्स्टीटयुट) या संस्थेत प्रवेश घेतला. त्यांनतर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित परीक्षा उत्तीर्ण करुन पुणे येथील नॅशनल डिफेंस ॲकेडमी येथे प्रवेश घेतला. तेथील खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट पदावर त्याची नुकतीच नियुक्ती झाली आहे.
सैन्य दलात सेवा करणा-या कुटुबीयांतून असल्याने क्षितीजने नेहमी देशसेवेसाठी करीयर करावे असे वाटायचे अशी भावना क्षितीजची आई सुवर्णा लिमसे यांनी व्यक्त केली. स्वत: जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून काम करणा-या दिपक लिमसे यांनी विदर्भातील मुलांनी व पालकांनी सैन्य दलात करीअरच्या संधीबाबत विचार करुन सैन्य दलात सहभागी व्हावे अशी आशा व्यक्त केली. क्षितीजचे कमी वयातील यश हे अन्य तरुणांसाठी निश्चीतच प्रेरणादायी आहे.
प्रारंभी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी कॅप्टन दिपक लिमसे व सौ. सुवर्णा लिमसे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल क्षितीज लिमसे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तसेच लिमसे यांच्या भारतीय सैन्य दलातील सेवेबद्दल शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी तर संचलन व आभार माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी केले.