पुणे: मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाकडून प्रत्येक भारतीय महिलेने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले.
पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर ,सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, श्रीनाथ भीमाले आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले, “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत रमाबाई आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय असे आहे. रमाबाई यांनी केलेला त्याग त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली साथ, प्रेरणा आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात दिलेला पाठिंबा अतिशय कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वविख्यात बनवण्यात निर्णायक वाटा रमाबाई आंबेडकर यांचा आहे.”
राष्ट्रपती कोविंद म्हणाले “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रमाबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. त्यांनी आपले ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तकही रमाबाई ह्यांना अर्पण केले आहे. या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतून त्यांच्या रमाबाई यांच्यावरील प्रेमाची अनुभूती येते.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मांडून महिलांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नेहमी महिलांचे अधिकार आणि सबळीकरण याचा विचार मांडला. त्यांच्या या विचारापाठीमागे मातोश्री रमाबाई यांची प्रेरणा होती, असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सांगितले.