Published On : Tue, Oct 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

नायडू-नीतीशप्रमाणे महाराष्ट्रात भरीव निधी आणू, निवडणुकीत समर्थन द्या: अजित पवार

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी विधानसभा मतदारसंघात पोहोचली. मोठ्या बाइक रॅलीने जनसन्मान यात्रेची सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे उपमुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते.

माजलगावच्या मंगलनाथ मैदानावर आयोजित सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, महायुतीला या भागाची सेवा करण्याची संधी मिळो, अशी मी प्रार्थना करतो. या भागातील विकासकामांची माहिती देताना त्यांनी ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. परतूर-माजलगाव रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी धारूर किल्ला आणि बिंदूसरा तलावाचा कायापालट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, ज्यामुळे स्थानिक रोजगार निर्माण होईल आणि छोट्या व्यवसायांना आधार मिळेल. या भागातील दुष्काळी परिस्थिती सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

Today’s Rate
Tuesday 01 Oct. 2024
Gold 24 KT 75,500 /-
Gold 22 KT 70,200 /-
Silver / Kg 90,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कांदा निर्यातबंदी हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. किमान निर्यात मूल्य काढून आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. १५ नोव्हेंबरनंतर राज्यातील साखर कारखान्यांचे कामकाज सुरु होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारच्या उपक्रमांची माहिती देताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळ ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी काम करत आहे. कृषीभूषण पुरस्कार सोहळ्यात ४९ लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार ३९८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून त्यातील १० टक्के रक्कम बीड जिल्ह्यातील खातेदारांना देण्यात आली आहे.अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Advertisement

महायुतीतील घटक पक्षांसोबत जागावाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, जागावाटप अद्याप ठरलेले नाही, पण काळजी करू नका, आमचा मतदारसंघ आमच्याकडेच राहील. महायुतीत राष्ट्रवादीलाजेवढ्या जागा मिळतील,त्यातील मी अल्पसंख्याकांना १० टक्के जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यभरातील होमगार्डच्या भत्त्यांमध्ये भरीव वाढ करण्याची घोषणा सरकारने केली असून, त्याचा लाभ सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. होमगार्डचे ५७० रुपये असलेले दिवसाचे वेतन आता १०८० रुपये करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रियपणे काम करत आहोत. प्रत्येकाच्या विकासासाठी आमचा प्रयत्न आहे. असेही ते म्हणाले.

परळी येथे बोलताना धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले, ते म्हणाले की, “अजितदादा हे एकमेव असे होते ज्यांना जनतेसाठी बदल घडवण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास होता,जे इतर कोणीही केले नाही.” आगामी निवडणुकीत बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघ जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे कृषीमंत्री म्हणून केलेल्या योगदानाचे कौतुक केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी आणि महायुतीला मतदान करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. मतदारांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांनी जे त्यांच्या राज्यात साध्य केले आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्राला ही भरीव निधी आणण्याची आमची क्षमता आहे.