मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. अजित पवार यांनी आपल्या काही समर्थक आमदारांसोबत शिंदे आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. त्यांनी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले. महाविकास आघाडीत आता काँग्रेस मोठा पक्ष झाला आहे.
यापार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येण्याची शक्यता असून, त्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीत विरोधी पक्षनेते पदाबाबत काही नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी तीनच दिवसांपूर्वी राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून बैठक घेतली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तसेच आगामी लोकसभा निवडणुकीवर यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
इतकेच नाही तर या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाबाबत तसेच काही नावांबाबत चर्चा झाल्याचे समजते. स्वत: पटोले हे सुद्धा विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छूक आहेत. तसेच विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही नावांची चर्चा आहे.