
File Pic
नागपूर: नागपुरातून खरेदी केलेली दारू चंद्रपुरात घेऊन जात असताना लोहमार्ग पोलिसांनी पकडले. ही कारवाई आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली. सूरज राम आसरे (२५, रा. रविंद्र वार्ड, बल्लारशाह) असे अटकेतील दारू तस्कराचे नाव आहे.
चंद्रपुरात दारू बंदी नंतर रेल्वेने अवैधरित्या दारू तस्करी वाढली. याकामी सुशिक्षीत बेरोजगार, महिला तसेच अल्पवयीन मुलांचाही वापर केला जातो. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांची जबाबदारी वाढली. आज दुपारच्या सुमारास लोहमार्ग पोलिस खुशाल शेंडगे, रवींद्र सावजी, प्रवीण भिमटे, अजय मसराम, योगेश घुरडे, रोशन मोगरे, संतोष निंभोरकर हे गस्तीवर असताना संतोष संशयीतरित्या आढळला.
विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याच्या जवळील नॉयलॉन पिशवीची झडती घेतली असता त्यात ५ हजार २०० रुपये किंमतीच्या २०० दारूच्या बाटल्या आढळल्या. नागपुरातून खरेदी केलेली दारू चंद्रपुरात घेऊन जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर त्याच्या विरुध्द लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली. ही कारवाई प्रभारी अधिकारी अतुल घरपांडे, उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.