नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या मदतीमुळे आपल्या हृदयावर शस्त्रक्रिया होऊ शकली आणि आज आपण ठणठणीत आहोत, या भावनेने एका चिमुकलीला अश्रू अनावर झाले. जनसंपर्क कार्यक्रमातील हा क्षण साऱ्यांनाच भावूक करून गेला.
ना. श्री. नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती. या गर्दीत संतोष यादव यांच्यासोबत आलेली काही मंडळी सुद्धा होती. त्या साऱ्यांना ना. श्री. गडकरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची होती. काही वेळाने त्यांची भेट झाली तेव्हा प्रत्येकाने आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या. दोन चिमुकल्यांच्या हृदयात छिद्र होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
कुणाची बायपास, कुणाची एन्जिओप्लास्टी झाली होती, तर कुणाचे व्हॉल्व रिप्लेसमेंट करण्यात आले होते. ना. श्री. गडकरी यांच्या मदतीमुळे या साऱ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. संतोष यादव हे गेल्या १९ वर्षांपासून सामाजिक कार्य करीत असून गरीब वस्त्यांमधील रुग्णांना ते ना. श्री. गडकरी यांच्या या उपक्रमात सामील करून घेतात. ना. श्री. गडकरी यांनी संतोष यादव यांच्या या धडपडीचेही कौतुक केले. जनसंपर्क कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, रस्त्याची कामे, नोकरी आदी कामांसाठी नागरिकांनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेतली. तर कुणी नाविन्यपूर्ण प्रयोगांचे प्रेझेंटेशन देण्यासाठी मंत्री महोदयांची भेट घेतली. शेतकरी, उद्योजक, कामगार संघटना, अध्यात्मिक, धार्मिक संघटना आदींनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेऊन विविध मागण्यांसाठी निवेदने दिली.
कुबड निघालेला ‘तो’ आता चालू लागणार!
मुर्तीजापूर येथील मनीष सुरेश गवई याच्या उपचारासाठी त्याचे वडील गेल्या २२ वर्षांपासून रुग्णालयांच्या फेऱ्या मारत होते. काही वर्षांपासून मनीष आणि त्यांच्या वडिलांनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेतली. मनीषचं कुबड निघालेलं होतं. त्याला चालताही येत नव्हते. बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्सेस (NIMHN) या रुग्णालयात त्याच्या मेंदूतील एक पेशी एक्टीव्ह नसल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी मेंदूमध्ये सेन्सर लावण्याची आवश्यकता आहे आणि त्याची किंमत लाखोंमध्ये आहे. ना. श्री. गडकरी यांनी या सेन्सरसाठी मनीषला मदत व्हावी म्हणून पूर्ण सहकार्य केले. आता लवकरच मनीष व्यवस्थित चालू शकणार आहे. जनसंपर्क कार्यक्रमात मनीष व त्याच्या वडिलांनी ना. श्री. गडकरी यांचे आभार मानले.