कोराडी वीज केंद्र प्रकल्पबाधित परिसरातील नागरिकांना महानिर्मिती कोराडी हॉस्पिटलच्या आरोग्य विषयक सोयी सुविधा जसे रुग्णसेवा, वैद्यकीय सुविधा, ई.एस.आय.सी. सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात याकरिता ९ जुलै रोजी राज्याचे उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली ह्या हॉस्पिटलची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला महानिर्मितीतर्फे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे, मुख्य अभियंता राजेश पाटील, महादुला नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजेश रंगारी तर स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे डॉ.दिलीप गुप्ता, उल्हास बुजोणे प्रामुख्याने उपस्थित होते.
हॉस्पिटलचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज अधिक सुनियोजित पद्धतीने चालावे याकरिता नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मिती व हॉस्पिटल प्रशासनाला निर्देश दिले असून मुख्य अभियंता कोराडी औष्णिक विद्युत केंद्र यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच प्रशासकीय समिती गठीत करण्यात येणार असून समितीची आढावा बैठक दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार आहे.
२० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय चमू कार्यरत असून परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी केले.
नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्र परिसरातील प्रकल्पबाधित गावांतील नागरिक, कंत्राटी कामगारांना स्वस्त दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने महानिर्मितीने सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत २० खाटांचे अद्ययावत हॉस्पिटल कोराडी येथे सुरु केले व त्याकरीता नागपुरातील नामांकित तसेच सेवाभावी अश्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी यांना सदर हॉस्पिटल चालविण्याकरिता २६ मे २०१६ ला सामंजस्य करार करण्यात आला. ९ ऑक्टोबर २०१६ ला राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते हॉस्पिटलचे उदघाटन करण्यात आले.
आढावा बैठकीला अधीक्षक अभियंता शैलेन्द्र गरजलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकेश गजभिये, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, कल्याण अधिकारी प्रसाद निकम, सहाय्यक कल्याण अधिकारी दिलीप वंजारी तसेच स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे डॉ. मृदुला बापट, डॉ. भाजीपाले, डॉ.जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.