– प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ,आठवड्यापासून दररोज भरधाव वाहनांच्या धडकेत गाईगुरे ठार तर दुचाकीचालक जखमी
रामटेक : मागील काही महिन्यांपासून रामटेकच्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर गाई आणि गोरे यांचे कळप भर रस्त्यावर काही काळ थांबायचे .पण मागील एक महिन्यापासून सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत ही जनावरे भर रस्त्याच्या मधोमध आठदहाच्या कळपाने बसून असतात त्यामुळे दुचाकी-चारचाकी वाहन चालक व तसेच लोडेड ट्रक,ट्रॅक्टर,आटो,जीपचालक यांना वाहन चालवताना प्रंचड त्रास सहन करावा लागत आहे. आणि गेल्या आठ दिवसापासून दररोज एकदोन गाईना चारचाकी वाहनांच्या धडकेत आपला जीव गमवावा लागत असून दोनतीन जनावरे गंभीर जखमी होत आहेत.
यासोबतच अनेक दुचाकी चालक नेहमीच अपघाताने दुखापतग्रस्त होत आहेत. ही जनावरे रेल्वे स्टेशन पासून तर अंबाळा मोडेपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी आणि गावातील इतरही ठिकाणच्या रस्त्यावर हमखास आपला ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत वाढ होत असून प्रशासनाचे या बाबीकडे कायम दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या नजरेत अनेकदा ही बाब दिसूनही ती या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.
बाजारपेठेतील परिसरात व सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या मुख्य रस्त्यावर ही जनावरे ठाण मांडून बसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अनेक लहान मुलामुलींना बसलेल्या व रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरामूळे रस्त्यावरील लोक रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात. गतीने चालणाऱ्या वाहनांमुळे गाईगुरांचे मरणे आणि पर्यटकांचे ,प्रवाशांचे जखमी होणे नित्याचे झाले आहे.
सर्वात जास्त त्रास रात्रीच्या वेळी होत असून अपघाताचे प्रमाण जास्त करून रात्रीच्या वेळीच आहे.त्रस्त नागरिकांनी अशी मागणी केली आहे की पालिका प्रशासनाने कोंडवाड्याची त्वरित व्यवस्था करावी किंवा या मोकाट जनावरांना गोशाळेत दाखल करावे जेणेकरून मुक्या जितरुबांचा जीवही जाणार नाही आणि लोकांना त्रासही होणार नाही. विशेषतः रोज रामटेकला पर्यटन व देवदर्शनाकरिता भाविक -पर्यटक येतात त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागत असून हे घटनाक्रम असेच सुरू राहीले तर त्याचा पर्यटन व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.